मार्टिन गप्टिलच्या तडाखंबेद नाबाद २३७ धावांवर सहयजमान न्यूझीलंडने विश्वचषक स्पर्धेतील आपली विजयी घौडदौड कायम राखताना चौथ्या आणि अखेरच्या उपांत्यपूर्व सामन्यात वेस्ट इंडिजला तब्बल १४३ धावांनी धूळ चारली. सलग सातव्या विजयासह किविजला पहिला द्विशतकवीरही लाभला! गप्टिल विश्व चषकातील दुसरा तथा ‘वन-डे’तील पाचवा द्विशतकवीर होय!! सलामीवीर मार्टीन गप्टीलने विश्व चषकातील दुसरे द्विशतक झळकविताना २२३ मिनिटातील १६३ चेंडूवर २४ चौकार आणि ११ षट्कार ठोकले. वैयक्तिक चार धावांवर जेरॉम टेलरच्या तिसर्या चेंडूवर शॉर्टलेगवरील मर्लोन सॅम्युएल्सकडून सोपे जीवदान लाभलेल्या गप्टिलने १११ चेंडूत शतक झळकविले आणि नंतर विलक्षण वेग घेत केवळ ५२ चेंडूत पुढील १३७ धावा ठोकल्या. गुप्टिलच्या झंझावातामुळे यजमानानी तिनशेवरून ३४०चा टप्पा अवघ्या १६ चेंडूत गाठला. ३९४ धावांच्या अवघड उद्दिष्टाच्या पाठलागातील वेस्ट इंडिजचा डाव ३०.५ २५० धावांवर आटोंपला. विंडीजच्या डावाला खिंडार पाडताना ट्रेट बोल्टने ४४ धावात ४ बळी घेतले तर टीम साऊथी आणि ज्येष्ठ फिरकीपटू डॅनियल व्हेटोरीने प्रत्येकी २ बळी घेतले. विश्व चषकातील पहिला द्विशतकवीर ख्रिस गेलने ३३ चेंडूत २ चौकार आणि ८ षट्कारासह सर्वाधिक ६१ धावा केल्या. अन्य एकही फलंदाज अर्धशतक झळकवू शकला नाही.