‘‘सत्ता कितीही अनिर्बंध असली तरी शेवटी तिचा वापर सफाजाच्या सेवेसाठी करायचा असतो, जनतेला धाकदपटशा दाखवण्यासाठी नाही हे या निकालाने दाखवून दिले आहे. कॉंग्रेससारख्या विरोधी पक्षाने अधिकृतपणे या निवडणुकीत भाग घेतला नाही, तरीदेखील सत्ताधारी पक्षाला रान मोकळे मिळेल हा कयास मतदारांनी पूर्णपणे खोटा ठरवला.’’
– विष्णू सूर्या वाघ, आमदार (भाजप)
जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांचा कालचा निकाल हा अनेकांचे डोळे उघडणारा आहे. विशेषत: सत्ताधार्यांचे. सत्ता कितीही अनिर्बंध असली तरी शेवटी तिचा वापर समाजाच्या सेवेसाठी करायचा असतो, जनतेला धाकदपटशा दाखवण्यासाठी नाही हे या निकालाने दाखवून दिले आहे. कॉंग्रेससारख्या विरोधी पक्षाने अधिकृतपणे या निवडणुकीत भाग घेतला नाही, तरीदेखील सत्ताधारी पक्षाला रान मोकळे मिळेल हा कयास मतदारांनी पूर्णपणे खोटा ठरवला. एकीकडे भाजप-मगो- गोविपाचे उमेदवार, तर दुसरीकडे काही पक्षांनी तर काही नेत्यांनी उभे केलेले उमेदवार अशी लढत बहुसंख्य ठिकाणी झाली. ही लढत अजिबात एकतर्फी झाली नाही, उलट अनेक ठिकाणी सरकारपक्ष व मंत्र्यांचे पाठबळ असतानाही त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. लोकशाहीत लोकशक्तीच प्रभावी ठरते याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले.
सर्वप्रथम, जिल्हा पंचायतीच्या या निवडणुका सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल आपण राज्य निवडणूक आयोगाचे खुल्या दिलाने अभिनंदन करावयास हवे. निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सिर व त्यांच्या संपूर्ण टीमची ही यशोगाथा आहे. अत्यंत कमी मुदतीत आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे अत्यंत कमी खर्चात ही निवडणूक त्यांनी घेऊन दाखवली. एरवी या निवडणुकीचा खर्च चार-पाच कोटींच्या घरात सहज गेला असता, तो मुदस्सिर यांनी दोन कोटींवर आणला. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांना त्यांनी पूर्णपणे फाटा दिला. बर्याच काळानंतर गोव्यात मतपत्रिकेद्वारे मतदान झाले. मतदानाच्या पूर्वतयारीसाठी आयोगाला अवघा एक महिनादेखिल मिळाला नव्हता, तरीही त्यांनी आयोजनाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले, याबद्दल शासकीय यंत्रणा अभिनंदनास पात्र आहे.
दुसरे अभिनंदन करायला हवे ते मतदारांचे. विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत प्रचाराची धामधूम फारशी नव्हती. प्रचारासाठी उमेदवारांना दिलेला कालावधीही अपुरा होता. तरीही मतदारांनी उत्साही मतदान केले. एकूण मतदानाची टक्केवारी ६६ टक्क्यांच्या वर गेली हे काही थोडेथोडके नाही. निवडणूक लोकसभेची असो की स्थानिक स्वराज्य संस्थेची, आपल्या मत देण्याच्या अधिकाराबाबत आपण किती जागृत आहोत ते मतदारांनी दाखवून दिले.
उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही जिल्ह्यांत निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाला अस्वस्थ करणारे आहेत. सर्वांत जिव्हारी लागणारा पराभव आहे तो लाटंबार्सेचा. सार्या गोव्याचे लक्ष त्या मतदारसंघाकडे लागले होते. निवडणुकीचा दिवस सरल्यानंतर लाटंबार्सेत सर्वाधिक मतदान झाल्याचे उघड झाले, तेव्हा तर उत्कंठा अधिकच वाढली. त्यापूर्वीचा प्रचारही जितका चुरशीचा तितकाच विखारीही झाला. काही वेळा प्रचाराने अत्यंत खालची पातळी गाठल्याचे दिसून आले. याच मतदारसंघात भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकार्याची गाडी फोडण्याचा प्रकार घडला. रात्रीच्या काळोखात विरोधकांनी गाडीवर हल्ला करूनदेखील त्यासंदर्भातील तक्रार पोलीस स्थानकात का दाखल झाली नाही हे अनाकलनीय आहे.
सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकार्यावर हल्ला होतो आणि हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न होत नाही याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. लाटंबार्से हा मतदारसंघ राखीव नसतानाही एका महिलेने त्या मतदारसंघात राहाण्याचे धाडस केले ही बाबही मतदारांनी गौण ठरवली. पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाने सर्व प्रकारची रसद या मतदारसंघात पुरवली होती हे काही आता गुपित राहिलेले नाही. तरीदेखील उमेदवार पडतो याचा अर्थ स्पष्ट आहे. लोकांना सदा सर्वकाळ गृहित धरता येत नाही!
दुसरा आश्चर्यकारक निकाल लागला आहे तो पेडणे तालुक्यातल्या मोरजी मतदारसंघात. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघात मोडणारी ही जिल्हा पंचायतीची जागा. जिथे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून श्रीमती श्रीधर मांजरेकर निवडून आल्या. एका अर्थी मुख्यमंत्र्यांना घरच्या मतदारांनी दिलेला हा अहेर आहे. मोरजीत श्रीमती मांजरेकर याच निवडून येणार असे चित्र होते. त्यासाठी ही जागा मगो पक्षाला द्यायला हवी होती, पण विधानसभेचा फॉर्म्युला वापरून श्रीमतींचा पत्ता कट करण्यात आला. त्यांचे पती श्रीधर मांजरेकर हे शह – काटशहांच्या खेळात अत्यंत प्रवीण. शिवाय त्यांच्या जनसंपर्कही दांडगा हे वास्तव दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी जाणून घ्यायला हवे होते. पण तसे झाले नाही. भाजपाने ही जागा स्वत:जवळ ठेवून घेण्याचा हट्ट धरला व तो अंगलट आला. परिणामी भाजपच्या उमेदवार माया शेटगावकर यांना हार पत्करावी लागली.
भाजपला धक्का देणारा आणखी एक निकाल आहे बार्देशमधल्या सुकूर मतदारसंघातला. अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी पुरस्कृत केलेल्या वैशाली सातार्डेकर या उमेदवार चार हजार मतांच्या फरकाने निवडून आल्या. विरोधात होत्या अर्थातच भाजपा उमेदवार धनश्री गडेकर. आपण ही निवडणूक चार हजारांच्या मताधिक्क्याने जिंकणार असे खंवटे सुरुवातीपासूनच सांगत होते. सर्वजण त्यांचा हा दावा हसण्यावारी नेत होते, कारण धनश्री गडेकर यांच्या मागे पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. धनश्रींचा प्रचार करता यावा म्हणून परूळेकरांनी आपल्या विदेश दौर्यावरही पाणी सोडले होते, पण शेवटी कोणताच उपयोग झाला नाही. रोहन खंवटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून प्रचार तर केलाच, पण कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचीही त्यांना आतून मदत झाली असे आता उघड झाले आहे. मायकल व परूळेकर या दोघांमधून सध्या विस्तवही जात नाही. जमेल तिथे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न हे दोघे करीत असतात. दोघांमधला हा दुुरावा भविष्यकाळात अधिक उग्र स्वरूप धारण करील अशी चिन्हे आताच स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
लाटंबार्सेप्रमाणेच धारगळ मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्र्यांचे पेडणे तालुक्यातील उजवे हात समजले जाणारे दीपक कळंगुटकर या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. निवडून आले तर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्षही तेच बनतील अशी हवा तयार करण्यात आली होती, पण कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन मैदानात उतरलेल्या तुकाराम कोरगावकर या नवख्या उमेदवाराने कळंगुटकरांचा पराभव केला. एकापरीने मुख्यमंत्र्यांना मिळालेली ही चपराक आहे. तुकारामच्या विजयाने पेडणे मतदारसंघात बाबू आजगांवकरांच्या आशा पल्लवीत होतील असे वाटते.
उत्तर गोव्याचे एकंदर चित्र पाहिल्यानंतर तिसवाडी तालुक्यात भारतीय जनता पक्षाची पुरती वाताहत झाल्याचे दिसून येते. तिसवाडीत ताळगाव, सांताक्रूज, सेंट लॉरेन्स, चिंबल, खोर्ली हे पाच मतदारसंघ येतात. यापैकी ताळगाव, चिंबल व सांताक्रुझ या तीन ठिकाणी बाबुशने आपले उमेदवार ठेवले होते. ताळगावात अपेक्षेप्रमाणे त्याचा सिडनी बार्रेटो हा उमेदवार जिंकून आला. भाजपच्या योगेश देसाईला सरकारपक्षाचे समर्थन असूनही सिडनीला नमवणे त्याला जमले नाही. चिंबल मतदारसंघात बाबुश समर्थक उमेदवार सुदेश कळंगुटकर हे मगोच्या संदीप वेर्णेकरकडून पराभूत झाले, हा निकाल बाबुशच्या मर्यादा दाखवून देणारा आहे. कारण या मतदारसंघातील चिंबल व मेरशी या दोन्ही पंचायती सांताक्रूज विधानसभा मतदारसंघात येतात. या लोकांची मते घेऊन बाबुश मोन्सेर्रात तीन वर्षांपूर्वी विधानसभेत गेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या लोकांची विचारपूस करणे सोडाच, पण मतदारसंघात पाऊलही ठेवले नव्हते. विधानसभेतही या मतदारसंघाचे प्रश्न बाबुशनी कधी मांडले नाहीत. याचा पूर्ण वचपा चिंबलच्या मतदारांनी काढला. सांताक्रूज मतदारसंघात (जि. पं.) परिस्थिती वेगळी होती. या मतदारसंघाला पूर्वीच्या कुडका-बांबोळी पंचायती व्यतिरिक्त भाटी व पाळे-शिरदोण या दोन नव्या पंचायती जोडण्यात आल्या. वरून हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव करण्यात आला. पूर्वी भाजपमधल्याच काही महिला पदाधिकार्यांच्या सोयीसाठी ही राखीवता ठेवण्यात आल्याचे बोलण्यात येत होते. पण वाटाघाटींदरम्यान हा मतदारसंघ मगो पक्षाकडे गेला आणि झटक्यात समीकरणे बदलली. स्वत:ला भाजपाचे म्हणवणारे बरेच पदाधिकारी बाबुशच्या गळाला लागले व त्यांनी मगोच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केले. स्वपक्षीयांनीच असा विश्वासघात केल्यामुळे सांताक्रूझमध्ये मगोच्या उमेदवार दीक्षा कवळेकर यांना पराभव पत्करावा लागला. तिसवाडी तालुक्यात अगदी ठळक म्हणावे असे यश लाभले आहे ते पांडुरंग मडकईकर यांना. खोर्लीतून पत्नी जनिता व सेंट लॉरेन्समधून बंधू धाकू यांना निवडून आणण्याचा एकहाती चमत्कार त्यांनी करून दाखवला. खोर्लीतूून शुभदा कुंडईकर या भाजपच्या उमेदवार म्हणून कडवी लढत देतील अशी अपेक्षा होती. सेंट लॉरेन्समध्ये तिन्ही उमेदवार करमळी या एकाच गावातील होते, शिवाय भाजपाचे उमेदवार नीलेश काणकोणकर हे तसे राजकारणात नवखे. पुन्हा या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सकाळी सकाळीच भाजपविरोधात मतदान करण्याचा फतवा चर्चमधील फादरच्या सेरमॉनमधून काढण्यात आला. त्याचाही फायदा धाकूंना झाला असला पाहिजे.
पाळी मतदारसंघात शुभेच्छा महेश गांवस यांचा झालेला विजय ही विद्यमान आमदार प्रमोद सावंत यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामानाने त्याना दिलासा मिळाला तो कारापूर-सर्वण मतदारसंघातून. तेथे अंकिता नावेलकर या विजयी झाल्या. होंडा (सरस्वती वाडकर), केरी (फटी गांवकर) मतदारसंघांनी प्रतापसिंग राणे व विश्वजित राणे यांची साथ अजूनही सोडलेली नाही हे निकालांवरून दिसून आले. नगरगाव मतदारसंघातही प्रेमनाथ हजारे यांच्या रूपाने विश्वजितची पकड कायम राहिली आहे.
बार्देश तालुक्याने भाजपच्या पारड्यात संमिश्र यश घातले. रोहन खंवटे यांनी वैशाली सातार्डेकर व गुपेश नाईक हे आपले दोन्ही उमेदवार निवडून आणले. परूळेकरांनी समर्थन दिलेले रूपेश नाईक रेईश मागूशमधून विजयी झाले. शिवोलीत मंत्री दयानंद मांद्रेकर यांचा वरचष्मा कायम राहिला. त्यांचे सानिशा तोरस्कर व वासुदेव कोरगांवकर हे दोन्ही उमेदवार निवडून आले. किरण कांदोळकरांचेही दोन्ही उमेदवार दीक्षा कांदोळकर (सिरसई) व गोविंद कुबल (कोलवाळ) विजयी झाले. मयेतून शंकर चोडणकर यांनी उपसभापती अनंत शेट यांच्यावर नामुष्की ओढवू दिली नाही.
मगो पक्षाला उत्तरेत केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. त्यातली एक त्यांनी जिंकली. दक्षिणेत त्या मानाने मगोचा ‘स्ट्राईक रेट’ बरा आहे. फोंडा तालुक्यातील बहुतेक सर्व जागा त्यांनी जिंकल्या. कुर्टी-़खांडेपार (मोहन वेरेकर), बेतकी-खांडोळा (बबिता गावकर), वेलींग – प्रियोळ (शिवदास गावडे) व कवळे (चित्रा फडते) हे चार जिल्हा पंचायत सदस्य मगोचे आहेत. गांजे उसगावमध्ये त्यांचा विजय हुकला. सांकवाळ मतदारसंघात मगोने अपर्णा नाईक यांना तिकीट दिले होते, पण ऍलीना साल्ढाणा व माविन गुदिन्हा यांनी संगनमत करून अपर्णाचा पराभव केला. कुठ्ठाळीच्या मतदारांनी ऍलीनांना जशास तसे उत्तर देत त्यांचा भाचा ओलेंसियो सिमोईश याचा पराभव केला. खुद्द आलीनाचे पती ख्रि. माथानी साल्ढाणा ज्यांचे नेतृत्व करीत होते त्या रांपोणकारांनी ऍलीनाच्या विरोधात जाऊन आंतोनियो वाझ याना निवडून आणले. मिकी पाशेको यांनी आपले चार उमेदवार उभे केले होते. त्यापैकी दोन विजयी झाले. कोलवामधून नेली रॉड्रीग्स आणि रायमधून फातिमा गावकर. मात्र फातिमा गावकर यांनी आपण गोविपाच्या तिकीटाऐवजी अपक्ष म्हणून उभे राहिले असते तर आपणाला अधिक मते पडली असती असे चमत्कारिक विधान निवडून आल्यानंतर केले. नुवे मतदारसंघात जिंकलेले विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान हे भविष्यातील मिकी यांचे प्रतिस्पर्धी ठरू शकतात.
दक्षिणेतील खाणपट्ट्यात भाजपला बर्यापैकी यश मिळाले आहे. रिवणमधून नवनाथ नाईक, सावर्डेतून सुवर्णा तेंडुलकर, धारबांदोड्यातून गोविंद गावकर, शेल्डेमधून पर्पेच्युएल फर्नांडिस विजयी झाले आहेत. मात्र बार्सेत मगो उमेदवार विठोबा वेळीप यांचा पराभव झाला. वेळ्ळीत मॅन्सी रॉड्रीक्स यांना विजय मिळाला. त्या आमदार बेंजामिन सिल्वा यांच्या विरोधी गोटातील आहेत. तीच कथा नावेलीतून विजयी झालेल्या एडवीन कार्दोज यांची. त्यांनी मंत्री आवेर्तान फुर्तादो पुरस्कृत उमेदवाराचा पराभव केला.
काणकोणमध्ये दोन मतदारसंघ येतात. पैकी पैंगीणमधून भाजपाच्या डॉ. पुष्पा अय्या विजयी झाल्या, मात्र खोला मतदारसंघात मंत्री रमेश तवडकर याना चपराक बसली. त्यांनी ठेवलेला कृष्णा वेळीप हा उमेदवार पराभूत झाला व विरोधकांनी समर्थन दिलेला शाणू वेळीप विजयी झाला. उद्योगमंत्री महादेव नाईक यांच्यासाठी दोन मतदारसंघ प्रतिष्ठेचे बनले होते. त्यापैकी बोरीतून त्यांचे उमेदवार दीपक नाईक बोरकर ४९९ मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले, परंतु शिरोडा त्यांनी गमवला.
जिल्हा पंचायतीचे चित्र हे एक प्रकारे धूसर आहे. वेळ पडल्यास अपक्षांच्या मदतीने का होईना, पण भाजपप्रणित आघाडी दोन्हीकडे सत्तेवर येऊ शकेल. पण पूर्ण बहुमत न मिळणे ही एकप्रकारची नामुष्कीच ठरेल. जनतेने विचारपूर्वक मतदान करून सत्ताधारी गटाला इशारा दिला आहे. यातून काही शिकायचे की नाही याचा निर्णय आता संबंधितांनी घ्यायचा आहे!