औषधी वनस्पतींची लागवड करण्यास गोव्याचे हवामान पोषक आहे. या पार्श्वभूमीवर दि. २७ पासून आयुष्यमान भारत, गोवा सरकार, आरोग्य भारती, भारती संस्कृती प्रबोधिनी, शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्या वनौषधी राष्ट्रीय परिसंवाद व हेल्थ एक्स्पो २०१५ चा गोव्यातील शेतकर्यांना व जनतेला लाभ होणार आहे, अशी माहिती गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष पी. के. घाटे व गोमंत भारतीचे डॉ. आदित्य बर्वे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.दि. २७ रोजी संध्याकाळी ५ वाजता कला अकादमीच्या दर्यासंगम येथे भरणार्या या हेल्थ एक्स्पोचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दि. ३० पर्यंत चालणार्या या प्रदर्शन मेळाव्यास देशभरातील सुमारे १०० आयुर्वेदिक कंपन्यांची दालने असेल. तसेच खास तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही लोकांना मोफत लाभणार आहेत. यात योग विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, योग संस्था, महाराष्ट्र व गोवा राज्यातील आयुर्वेदिक, महाविद्यालये होमीयोपॅथीक, युनानीसिध्द स्पा व आयुर्वेदिक क्लिनिक्स यांचाही सहभाग असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
दि. २८ रोजी कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर सभागृहात होणार्या राष्ट्रीय वनौषधी परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसौझा, वनमंत्री एलिना साल्ढाणा, कृषीमंत्री रमेश तवडकर व अन्य मान्यवर उपस्थित राहतील. त्याच दिवशी मनोरंजन सोसायटीच्या सभागृहात ‘उत्तम शेतीची लागवड कशी करावी’ यावर गोव्यातील व गोव्याबाहेरील शेतकर्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले जाईल. या कार्यक्रमास देशभरातील शेकडो डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी होतील. पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण व श्री श्री रविशंकर यांनी या आयुष्य मेळाव्यास उपस्थित राहावे म्हणून प्रयत्न चालू असल्याचे डॉ. बर्वे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस अभय प्रभू, डॉ. क्षीप्रा लवंदे उपस्थित होत्या.