अतिसाराचा दुसरा बळी

0
101

पाली-सत्तरीतील नागरिकांत भीतीचे वातावरण
पाली-सत्तरीत काल अतिसाराचा दुसरा बळी गेला असून या गावात आतापर्यंत अतिसाराची २५ लोकांना लागण झाली आहे. मात्र यावर उपाययोजना करणारी शासकीय यंत्रणा सुट्टीवर गेली आहे.
पाली येथे १ रोजीपासून तापाची व उलट्या जुलाब होण्याची साथ सुरू झाली होती. त्यासाठी वाळपई रुग्णालयात उपचार सुरू होते पण दि. ४ रोजी रुक्मिणी भिकाजी पर्येकर हिचा अतिसाराने मृत्यू झाला. त्यानंतर काल धानू सावंत (३८) यांचा अतिसाराने मृत्यू झाला. धानू यांना उलट्या व जुलाब होत असल्याने वाळपई हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने गोमेकॉ येथे पाठविण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांचे निधन झाले.२५ लोकांना अतिसार
दहा दिवसांपासून पाळी (सत्तरी) येथे अतिसारामुळे २५ लोकांना त्रास सुरू झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. सध्या गोमेकॉत धर्मा सावंत, संदीप सावंत व महादेव सावंत तर वाळपई रुग्णालयात विठ्ठल सावंत, द्रोपदी गांवकर हे उपचार घेत आहेत. तसेच काहीनी गोमेकॉत बांबोळी येथे उपचार घेतले आहेत.
शासकीय यंत्रणा सुट्टीवर
पाण्याचे व रक्ताचे नमुने दि. ५ रोजी तपासणीसाठी नेण्यात आले होते. दि. ७ व ८ रोजी शनिवार व रविवार झाल्याने ते नमुने तसेच पडून राहिले आहेत. वाळपईतील आरोग्य अधिकारी सुरेखा परुळेकर सांगतात की जोपर्यंत नमुन्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत काहीही करता येत नाही. आरोग्य खात्याने अतिसाराचा दुसरा बळी जाऊन सुध्दा निष्काळजीपणा केल्याची प्रतिक्रिया पाळी सत्तरीतील नागरिक व्यक्त करीत आहेत. पाळी-सत्तरीत अतिसाराने त्रस्त असलेल्या रुक्मिणी पर्येकर यांची स्थिती खालवल्याने वाळपई रुग्णालयातून त्यांना दि. ४ रोजी ३ वा. गोमेकॉत पाठविण्यात आले. त्या गोमेकॉत ४ वा. पोहोचल्यानंतरही तेथील डॉक्टरांनी रात्री १२ वा. त्याना दाखल करून घेतले व त्यांचा त्यानंतर १५ मिनिटात मृत्यू झाला, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.