शिवसेनेसह रा. स्व. संघाकडूनही हल्लाबोल
देशद्रोहासह अन्य अनेक गुन्हे नावावर असलेल्या मशरत आलम याला शनिवारी तुरुंगातून सोडण्यात आल्यामुळे विरोधकांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व शिवसेना यांनीही केंद्रातील भाजपला घेरले आहे. रा. स्व. संघाने तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद हे भारतीय आहेत काय हे त्यांना स्पष्टपणे विचारा असा सल्ला भाजपला दिला आहे.‘द ऑर्गनायझर’ या संघाच्या मुखपत्राने मुफ्ती महंमद सईद यांच्या कृतीवर व त्या संदर्भात भाजपने घेतलेल्या मौनाबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. या विषयावर सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंह यांनी लेख लिहून भाजपला अनेक सवाल केले आहेत. मुफ्ती हे खरोखरच भारतीय आहेत का? ते भारताशी निष्ठावंत आहेत का? असे भाजपने त्यांना विचारावे असे सिंह यांनी लेखात म्हटले आहे. आपल्याच देशात हिंदू व शीख यांना शरणार्थी म्हणून रहावे लागत आहे. पण केंद्र सरकारला या शरणार्थींपेक्षा काश्मीरची अधिक चिंता वाटते. काश्मीरवर सरकार मेहेरबाज झाले असून त्यांना अनेक सवलती बहाल केल्या जात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
मशरतच्या सुटकेमुळे भाजपात अस्वस्थता
जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजप युती सरकारने देशद्रोहाचा आरोप असलेल्या मशरत आलम याची तुरुंगातून सुटका केल्यामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मशरत आलम याला बारामुल्ला तुरुंगात ठेवण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार मशरत आलम याची सुटका करण्याचा निर्णय घेण्याआधी भाजपला विश्वासात का घेण्यात आले नाही असा सवाल करण्यात येत आहे.शिवसेना नेते संजय राऊत यांनीही त्यासंदर्भात तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आम्ही पीडीपीबरोबर सरकार स्थापन करणे हे धोक्याचे असल्याचा इशारा भाजपला दिला होता. मशरत आलमची सुटका करणे चुकीचे आहे. मुफ्ती महंमद सईद हे खरे भारतीय नाहीत’ अशी टिप्पणी राऊत यांनी केली. तर सुटका झालेला मशरत आलम याची मग्रुरी कायम आहे. सरकारे कितीही वेळा बदलतील. मात्र वास्तव तेच राहील असे तो म्हणाला. ‘मला तीनदा जामीन मिळाला आहे. त्यामुळे आताही माझी तशीच सुटका झाली आहे. मी माझे आयुष्य तुरुंगात घालवले आहे. पुन्हा अटक झाली तरी त्यात मोठे काही नाही’ अशी मुक्ताफळे त्याने उधळली.