मुलासह आईची दोनापावला येथे आत्महत्या

0
106

आपल्या पतीने आत्महत्या केल्यामुळे मानसिकरीत्या खचलेल्या साळगाव येथील मिलाग्रीन डिसोझा (३४) या महिलेने काल पहाटे ५ च्या सुमारास एड्रियान डिसोझा (७) या आपल्या कोवळ्या मुलासह दोनापावला येथे समुद्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली. मिलाग्रीन ही आपल्या जीए – ०३ एबी- ००२१ या स्कूटरवरून आपल्या मुलासह दोनापावला जेटीवर गेली. पर्स जेटीवर ठेवून तिने प्रथम आपला मुलगा एड्रियान याला धक्का देऊन समुद्रात टाकले व नंतर आपण उडी घेतली, असे या घटनेच्या वेळी तेथे गळ टाकून मासळी पकडणार्‍या एका मच्छिमाराने पोलिसांना माहिती देताना सांगितले.घटनेनंतर त्यांनी ताबडतोब पणजी पोलीस व पणजी अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी नंतर दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. दोन्ही मृतदेह नंतर उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवण्यात आले. मिलाग्रीन हिचे पती लॉरेन्स डिसौझा यांनी गेल्या २६ जानेवारी रोजी साळगाव येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. लॉरेन्स हा विदेशात नोकरी करत होता. मात्र, मानसिक स्थिती बिघडल्याने तो नोकरी सोडून गोव्यात परतला होता. त्याच स्थितीत २६ जानेवारी रोजी त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.
पतीने आत्महत्या केल्याने निराश होऊन मिलाग्रीनने आपल्या मुलासह आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे असून याबाबत पुढील तपास चालू आहे. मिलाग्रीनच्या पर्समध्ये मिळालेले ओळखपत्र व मोबाइल यामुळे तिची ओळख पटली. पणजी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.