राज्यात स्वाइन फ्लूचे आणखी दोन रुग्ण काल सापडले. त्यामुळे आतापर्यंत राज्यात या रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १४ वर पोचली आहे. यापूर्वी राज्यात स्वाइन फ्लूचे १२ रुग्ण सापडले होते. पैकी ११ जण उपचारानंतर रोगमुक्त झाले होते, तर उपचारासाठी उशिरा आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारने गोमेकॉत स्वतंत्र खोलीची व्यवस्था केलेली आहे. तसेच अन्य ठिकाणीही तशी व्यवस्था केली असल्याचे आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी यापूर्वीच सांगितले होते. राज्यात चिंता करण्याएवढा स्वाइन फ्लू पसरलेला नाही. पण तरीही लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. ताप, सर्दीची लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य खात्यातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.