विविध मागण्यांसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून संपावर असलेल्या १०८ रुग्णवाहिका कर्मचार्यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास उद्या सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचार्यांचे नेते हृदयनाथ शिरोडकर व अमर धारगळकर यांनी काल येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चार-पाच दिवस साखळी उपोषण करण्यात येईल आणि तरीही मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले. जीव्हीके एम्आर्आय् ही १०८ रुग्णवाहिका चालवणारी कंपनी कर्मचार्यांची सतवणूक करत असल्याचा आरोप करत कर्मचार्यांवर जादा तास काम करण्याची सक्ती केली जाते. बहुतेक रुग्णवाहिकांमधील वातानुकूलीत यंत्रणा चालत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असतात. ११ कर्मचार्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आलेले आहे, अशा तक्रारी त्यांनी यावेळी केल्या. रुग्णवाहिकांचे कर्मचारी संपावर असल्याने कंपनीने रुग्णवाहिकांसाठी बाहेरून कर्मचारी आणले आहेत. मात्र, या रुग्णवाहिकांत काम करण्यासाठीचे आवश्यक ते प्रशिक्षण त्यांच्याकडे नसल्याचा दावा हृदयनाथ शिरोडकर व अमर धारगळकर यांनी यावेळी केला.