पारंपरिक स्वरूप हरवलेला शिगमोत्सव!

0
738

गोवा राज्यात साजर्‍या होणार्‍या प्रमुख उत्सवांपैकी शिगमो हा एक उत्सव. वर्षभर कष्ट करून थकल्या-भागल्यानंर उसंत घेऊन मौज-मजा करण्याचा कष्टकरी लोकांचा उत्सव. कष्ट करून धान्य घरात आल्यामुळे उदर भरण्याची चिंता मिटलेली असते. त्यामुळे आनंदी होऊन मनसोक्तपणे सर्वजण एकत्र येऊन गावात उत्साही वातावरण निर्मिती करणारा असा हा शिगमोत्सव! लवकरच येणार्‍या वर्षा ऋतूची चाहूल देणारा! निसर्गामध्ये होणार्‍या ऋतू बदल, वातावरण हवामान बदलामुळे माणसाच्या दैनंदिन जीवनमानात बदल घडवून आणणारा असा हा शिमगोत्सव!गोव्यात विविध परंपरांचे जतन करीत ग्रामीण भागांतील लोकांना आनंद लुटण्यासाठी एकत्र आणणारा असा हा शिगमोत्सव. त्याचे रंग आगळेवेगळे! ढंग तर न्यारे! प्रत्येक गावातील शिगमोत्सवाची वैशिष्ट्ये आगळी-वेगळी! दक्षिण गोव्यात फाल्गून पौर्णिमेला म्हणजे होळी पौर्णिमेला संपतो तर उत्तर गोव्यातील सत्तरी, डिचोली, बार्देश, पेडणे या चार तालुक्यांत होळी पौर्णिमेने शिगमोत्सव सुरू होतो. तब्बल पंधरा दिवस वेगवेगळ्या लोककलांचे दर्शन घडविणारा हा उत्सव फाल्गून महिन्यातील अमावस्येस संपतो. नव वर्षानिमित्ताने नवे संकल्प, योजना नि हिंदू धर्म-संस्कृतीची अभिवृद्धी करण्याचा संकल्प सोडून ‘ब्रह्म-ध्वज’ म्हणजे गुढी उभारण्याचा गुढी पाडवा उत्सव साजरा करून वर्षाची सुरुवात करण्याची मानसिकता ठेवण्याची पूर्वतयारी- पार्श्‍वभूमी शिगमोत्सवातून तयार होते.
ढोलावर काठी पडली की गावोन्‌गाव विविध लोककला प्रकार सादर करण्यासाठी पूर्वतयारी सुरू होते. ज्या ठिकाणी ही तयारी चालते त्याला ‘मांड’ म्हणतात. तिन्हीसांजेपासून रात्री ९-१० वाजेपर्यंत या मांडावर ढोल-ताशे झांज यांच्या आवाजांचे नाद उमटतात नि गावातील आसमंत शिगमोत्सवी संगीताने निनादून जातो. अंत्रूज महालातील शिगमो ओस्सय, ओस्सयच्या घोषणा-तालांत साजरा होतो. जांबवलीचा गुलालोत्सव, पैंगीण काणकोणचा गोफ, दक्षिण व उत्तर गोव्यातील रोमटांमेळ, उत्तर गोव्यातील साळचे गडे, सर्वण गावचा मोरूलो, बोर्डेची घोडेमोडणी, पर्ये-सत्तरीची तरंगे, नानोडा – डिचोलीचा करवली, सत्तरी – डिचोली तालुक्यातील पर्ये, कुडचिरे गांवचे धनगर नृत्य, समई नृत्य अशा विविध लोककलांचे दर्शन शिगमोत्सवातून घडते.
उत्तर गोव्यातील विविध गावांतले लोककला प्रकार नि त्यांची वैशिष्ट्ये आगळी-वेगळी. होळी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी गावात ‘चोर’ बनून येणार्‍यांना नारळ किंवा पैसे दिले जातात. त्याच दिवसापासून तीन दिवस गावातली तरुण मंडळी ‘शबय, शबयऽ’ म्हणत घरोन्‌घर फिरतात. शबय म्हणून नारळ, केळी, खाण्याची फळे, किंवा पैसे या कलापथकांना देण्याची प्रथा आहे. ‘शबयचे बावले, तारीकडे पावले, शबय, शबयऽऽ!’ अशी ललकारी ही मंडळी देतात. ढोलकी, टाळ नि झांज यांच्या वादनाच्या तालावर धनगर लोकगीते सादर करीत गांवभर फिरतात. नाथपंथीय गोसावी (गोंसाय) शंख घेऊन प्रत्येक घरी शंखनाद करी प्रार्थना आळवतात. ‘पाव सिद्धा, महापुरुषा, बरें कर!’ असे म्हणतात. ही परंपरा आजही टिकून आहे. चौथ्या दिवशी रोमटामेळ गावांतून फिरतात. तालगडी, मोरूलो व विविध लोकनृत्ये सादर केली जातात. सर्वण, डिचोली, बोर्डे गांवांत घोडेमोडणी उत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारापूर, सर्वण, बोर्डे, कुडणे आदी गावात ‘अग्नीदिव्य’ करण्याची परंपरा आहे.
गावातील ग्रामदैवत असलेल्या देवीचा ‘कळस’ प्रत्येक घरी नेण्यात येतो. लोक कळसाची पूजा करून पुढील वर्षासाठी आपली राखण कर म्हणून कळसाकडे प्रार्थना करतात. हा उत्सव ‘कळसोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार वर्षाच्या शेवटी धुळवड खेळून फाल्गून अमावस्येपर्यंत या उत्सवाची सांगता होते, तीच मुळी नूतन वर्षांचे हर्षभरे, गुढी उभारून स्वागत करण्यासाठी! अशा या शिगमोत्सवाचे पारंपरिक महत्त्व जाणून ग्रामीण भागांतील लोकांनी आजही टिकवून ठेवले आहे. सारे मतभेद, जातीभेद, जमातीभेद विसरून एकत्र येऊन सामूहिक आनंदाचा अनुभव घेण्याची संधी शिगमोत्सवातून लाभते. त्यातून नव्या वर्षासाठी नवी ऊर्मी, उमेद, नि उत्साह प्राप्त होते. असा हा वैशिष्ट्यपूर्ण लोककलांचे दर्शन घडविणारा शिगमोत्सव आज बाजारी, तकलादू स्वरुप प्राप्त करू पाहतोय. त्यामुळे पारंपरिक शिगमोत्सवाचा रंग नि ढंग आपण हरवून बसणार की काय, अशी भीती वाटते.
ग्रामीण भागातील पारंपारिक शिगमोत्सवाला उत्तेजन देण्याची आज गरज आहे. गोवा सरकारने प्रत्येक तालुक्यातील ठिकाणी भव्य-दिव्य स्वरूपात नि दिमाखात ज्या पद्धतीने शिगमोत्सव साजरे करण्याचे प्रायोजन ठेवले आहे, ते पाहता त्यातून शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या पारंपरिक शिगमोत्सवाला प्रोत्साहन फारच कमी मिळते. स्पर्धात्मक दृष्टी ठेवून मोठ-मोठे चित्ररथ तयार करणे, त्यांची मिरवणूक काढणे, यातून हाती काय लागते? तालुका पातळीवर ज्या शिगमोत्सव समित्या स्थापन होतात, त्याच मुळी काही अपवाद सोडल्यास राजकीय हेतू प्रेरित असतात. स्थानिक राजकीय पक्ष नेत्यांच्या पुढारपणाखाली त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वावरणारे नवसे-हौसे यांचा समितीत समावेश करण्यात येतो. मोठ्या प्रमाणात निधी जमवून पैशांची उधळपट्टी आणि कार्यकर्त्यांची मौजमजा एवढीच जमेची बाजू. प्रत्येक तालुक्या ठिकाणी तेच-तेच चित्ररथ, तेच रोमटामेळ! त्यांचीच चलती नि बक्षीसरूपी कमाई! पारंपरिक ग्रामीण भागातील लोककलांचे जतन करणारे अशा स्पर्धांतून मागे राहतात. खर्‍या कलांचे दर्शन घडविणारा ग्रामीण शिगमोत्सव अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर काही ठोस निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी पर्यटन खाते व इतर सहकारी संबंधित यंत्रणेला करावी लागेल. राज्य पातळीवर चित्ररथ, रोमटामेळ, लोककला पथक आदीसाठी राजधानी पणजी येथे स्पर्धा घेण्यात यावी. इतर तालुका ठिकाणी याच तालुक्यातील गांवची कलापथके शिगमोत्सवात सहभागी होऊ शकतात अशी सक्ती ठेवावी. ज्यामुळे ग्रामीण भागातील शिगमोत्सवी लोककला सादर करणारे कलाकार स्वयंस्फूर्तीने सहभागी होतील. त्यांच्यामध्ये असलेल्या लोककलांना उत्तेजन-प्रोत्साहन मिळून त्यांच्या कलांना दाद मिळेल! शासनाने ग्रामीण शिमगो कलाकारांनी दखल घेतली असे होईल!
कला अकादमीतर्फे व शासनातर्फे लोककला पथकांना गोव्याबाहेर आपल्या लोककला सादर करण्याची संधी लाभते. त्यामुळे आजही पारंपरिक लोककला प्रकारांचे जतन करून त्याची वृद्धी व्हावी, युवकांना या लोककला अवगत व्हाव्यात म्हणून गावची ज्येष्ठ जाणकार मंडळी परिश्रम घेतात. आपल्या गावाचा नावलौकिक वाढावा म्हणून धडपडतात. त्यांची ही धडपड सार्थकी लागावी म्हणून तालुका पातळीवर मर्यादित ग्रामीण भागांतील लोककलांचे दर्शन घडविणारा शिगमोत्सव सादर होणे आवश्यक आहे. बाजारी, भव्य-दिव्य, दिमाखादार असे राजकीय रंग प्रेरित साजरे केले जाणारे शिगमोत्सव मूळ हेतू साध्य करणारे नाहीत हे खेदाने म्हणावे लागते. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-झांजाच्या तालावर डोळ्यांचे पारणे फेडणारे लोककला नृत्यप्रकार अस्सल स्वरुपात पारंपरिक पद्धतीच्या शिगमोत्सवात पाहायला मिळतात. ग्रामीण शिगमोत्सवाची वैशिष्ट्ये वेगळी, स्वरूप आगळे नि रंग-ढंग अफलातून असते! असा हा शिगमो शतकानशतके परंपरा लाभलेला. तो टिकवून ठेवून अबाधित नि अभिवृद्धित करण्याची जबाबदारी शासनासह सर्वांचीच आहे. याचे भान या वर्षीच्या शिगमोत्सवानिमित्ताने सर्वांनी ठेवावे अशी अपेक्षा!