साथ पसरल्याने अनेकजण आजारी
पाळी-सत्तरी येथे अतिसाराची साथ पसरली असून या आजारामुळे रुक्मिणी भिकाजी पर्येकर (६२) या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे गावात खळबळ माजली आहे.चार दिवसांपासून सावंतवाडा पाल येथे ताप, उलट्या व अतिसाराच्या साथीने लोक हैराण झाले आहेत. या रोगाने पीडित महिलेला वाळपई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, तिची प्रकृती अत्यंत खालावल्याने तिला बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आले होते. मात्र, तिथे उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा पाठविण्यात आले होते. मात्र, तिथे उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा तिचे निधन झाले. अन्य एक रुग्ण लता विश्वास गावकर हिलाही जुलाब होऊ लागल्याने गोमेकॉत पाठविण्यात आले आहे. सध्या अतिसाराची लागण झालेल्या द्रौपदी सावंत, गिरजू सावंत, संतोष सिताराम सावंत व धानो येसो सावंत हे रुग्ण वाळपई रुग्णालयात उपचार घेत आहेत. पाळीत आणखीही काहीजण तापाने आजारी असून अतिसाराची साथ सुरू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
दूषित पाण्यामुळे फैलाव
पाळी गावात एका ठिकाणी पाणी पुरवठा वाहिनी फुटली असल्याने पाण्याच्या टाकीत दूषित पाणी येण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. येथील ग्रामस्थ नळाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत असून त्यामुळे ही साथ फैलावली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, अतिसाराने बाधीत रुग्णांच्या रक्ताचे नमुने वाळपई इस्पितळात एका पथकाने तपासणीसाठी पाठविले आहे. इस्पितळातील तसेच पाणीपुरवठा ज्या ठिकाणाहून होतो, त्या पाण्याचा नमुनाही पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आज येणार आहे. वाळपई इस्पितळातील अधिकारी सुरेखा परुळेकर, राज्य तपासणी पथकाचे प्रमुख उत्कर्ष बेतोडकर यांनी पाळी गावाला भेट देऊन तपासणी केली.