युवतीसह तीन गंभीर
पिशे डोंगरी, खारीवाडा येथे राहणारा एलिस्टन डिमेलो (२२) हा युवक आपल्या मैत्रीणीसह अन्य चार मित्रांना घेऊन जात असताना वेर्णा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच ठार झाला. काल पहाटे ३.३० वा. झालेल्या अपघातात एलिस्टनचे मित्र अँथोनी रिबेलो व रोहन गौड यांची प्रकृती एकदम गंभीर असल्याने त्यांच्यावर व उमा अलय या युवतीवर बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू आहेत. जोझेफ डिसोझा व पेट्रीक डिसोझा या अन्य जखमींवर बायणा येथे एका खासगी इस्पितळात उपचार चालू आहेत.काल पहाटे ३.३० च्या सुमारास वेर्णा महामार्गावरील बीट्स पिलानी कॉलेजच्या जवळील रस्त्यावर झेन ऍस्टीलो (जीए- ०३- एच- १६५४) क्रमांकाच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती वेर्णा पोलीस व अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी त्वरित धाव घेतली. अपघातात पुढच्या बाजूने चक्काचूर झालेल्या कारमध्ये एलिस्टन व त्याचा अन्य एक मित्र अडकून राहिले होते. गाडीचा काही भाग कापून त्यांना बाहेर काढण्यात आले. यावेळी एलिस्टन जागीच ठार झाल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याचे कारमधील मित्र व मैत्रिण जखमी असल्याचे दिसून आल्याने त्यांना त्वरित उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले. दरम्यान, एलिस्टने भर वेगाने एका अवजड वाहनाला जबर धडक दिल्याने अपघात झाल्याचा कयास पोलीस व्यक्त करीत आहेत. अपघातात ठार झालेला एलिस्टन हा दाबोळी विमनातळावर नुकताच कामाला लागला होता.