‘त्या काळात पराभवही ‘दारूण’ असायचा… ’  : मुख्यमंत्री

0
114

सुरवातीच्या राजकीय वाटचालीला दिला उजाळा
ज्या काळात डिपॉझिटही जप्त होत असे आणि सभेला जास्त लोकही जमत नसत अशा आपल्या अगदी सुरवातीच्या राजकीय दिवसांच्या मजेदार आठवणी ताज्या करीत आणि विनोदाचे चौकार – षटकार लगावीत काल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या सत्कार समारंभात बहार आणली. श्री. सावईकर यांची दक्षिण गोव्याच्या खासदारपदी निवड झाल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील त्यांच्या जुन्या मित्रपरिवारातर्फे या सत्कार सोहळ्याचे आयोजन पणजीत करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या श्री. पार्सेकर यांनी आपल्या सुरवातीच्या राजकीय जीवनाचे किस्से सांगितले. त्या काळी निवडणुकांत झालेला पराभव ‘दारूण’ असायचा, जाहीर सभांना लोक फिरकत नसल्याने तिठ्यावर जमलेल्या गर्दीसमोर भाषणे करून त्यांना ‘कोपरा सभा’ घेतल्याचे म्हणावे लागायचे, सभांना जमणारे तुरळक श्रोतेही तेच तेच असायचे असे सांगत पार्सेकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या गोव्यातील प्रारंभिक वाटचालीतील अनुभव सांगितले. प्रचारकाळात भूक लागल्याने हॉटेलमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांना ते भाजपचे असल्याने जेवणही नाकारले गेले होते अशी एक आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. मात्र, पराभवाने खचून न जाता चिकाटीने प्रयत्न सुरूच ठेवल्यानेच आजचे दिवस पक्षाला आणि नेत्यांना पाहायला मिळाले आहेत, याची त्यांनी आठवण करून दिली. एका ध्येयाने प्रेरित होऊन गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे व्हा अशी हाक त्यांनी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना दिली. आपले राष्ट्र परमवैभवाला नेणे हेच अंतिम ध्येय असले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना प्रा. दत्ता भि. नाईक यांनी गोव्याचे सध्याचे दोन्ही खासदार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून घडले असल्याचे साभिमान नमूद केले. खासदार श्रीपाद नाईक यांनी गोव्यात विद्यार्थी परिषदेचा पाया रचला होता आणि श्री. सावईकर हेही परिषदेचे महत्त्वाचे कार्यकर्ते होते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री. सावईकर यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला, तर श्री. संदीप बुर्ये यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना शाल, श्रीफळ व गणेशमूर्ती देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थी परिषदेच्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. माजी सभापती विश्वास सतरकर, कामगार नेते अजितसिंह राणे यांचाही त्यात समावेश होता. श्रीरंग जांभळे यांनी सूत्रसंचालन केले, तर आनंद गावकर यांनी आभार मानले.