खून झाल्याचा पोलिसांना संशय
पिरझोन-मयडे (बार्देश) येथील नदीत प्लॅस्टिक व चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत ३० ते ४० वर्षांच्या अज्ञात युवकाचा पाण्याबरोबर वाहून आलेला कुजलेल्या स्थितीतील मृतदेह सापडला असून त्याचा गळा दाबून खून केला असावा असा कयास म्हापसा पोलिसांनी व्यक्त करून खून झाल्याची नोंद केली आहे.याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने पिरझोन, मयडे येथील नदीत एका व्यक्तीचा मृतदेह वाहून आल्याची माहिती दिली. त्यानंतर म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार वेर्णेकर, उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर, जतीन पोतदार, संदीप हळदणकर, हवालदार केशव नाईक, अजय गावकर, कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, दिनेश साटेलकर, विष्णू महाले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सदर मृतदेह प्लॅस्टिक आणि दोन चादरींच्या सहाय्याने गुंडाळलेला होता. त्याचा कुणीतरी झोपलेल्या ठिकाणीच गळा दाबून खून करून मृतदेह नदीत फेकून दिला असल्याचा संशय पोलिसांना आहे. मृतदेह पाण्याबाहेर काढला असता दुर्गंधी येत होती. मृतदेहाची अवस्था छिन्नविछीन्न झाली होती. हा खून गेल्या ४ ते ५ दिवसांपूर्वी करण्यात आला असावा असा संशयही म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार वेर्णेकर यांनी व्यक्त केला.
मयत युवकाचे नाव कळू शकले नाही. त्याच्या अंगावर काळ्या पट्ट्याचा लाल रंगाचा टी-शर्ट व रात्रीच्या वेळी घालण्यात येणारी नाईट पँट होती. हा खून रात्रीच्या वेळीच झोपेत असताना गळा दाबून करून तो प्लॅस्टिक व त्यावर असलेल्या मृतदेहाखाली व मृतदेहावर एक चादर गुंडाळून पाण्यात फेकण्यात आला होता. मयडे भागातील व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद म्हापसा पोलिसात नसल्याने तो मृतदेह मयडे येथील नसून इतर ठिकाणचा असावा असेही पोलिसांनी सांगितले.