मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो पणजी शहरापासून दूर कुठेतरी हलवता येतील व ते नेमके कुठे हलवायचे याबाबत विचार चालू असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. या पोटनिवडणुकीत जर कॉंग्रेसने कॅसिनो हा एक मुद्दा बनवला तर तो त्यांच्यावरच बूमरँग होईल, कारण सर्व तरंगते कॅसिनो कॉंग्रेसनेच गोव्यात आणले होते. भाजपने एकही तरंगता कॅसिनो आणला नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. विकास, पारदर्शक प्रशासन व स्थैर्य हेच या पोटनिवडणुकीतील भाजपचे मुख्य मुद्दे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोव्याच्या विकासासाठी भाजपने गुंतवणूक धोरण तयार केले आहे. त्याद्वारे राज्यात प्रदूषण मुक्त, पर्यावरणाचे नुकसान न करणारे व चांगला रोजगार देणारे उद्योग स्थापन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीसाठी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत आणि म्हणूनच ते केवळ कॅसिनोंचा मुद्दा उपस्थित करू पाहत असल्याचे पार्सेकर म्हणाले. मात्र, त्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट करताना कॅसिनो हे त्यांचेच बाळ आहे, असे ते म्हणाले. यंदा मुलांना ई-टॅबलेट देण्यात येणार नसून त्या वितरित करणे सध्या तरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुले टॅबलेट्सचा गैरवापर करतात अशी पालकांची तक्रार असल्याचे ते म्हणाले. मात्र, लॅपटॉप देणे चालू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.