– सुभाष येंडे, वन-डिचोली
गोवा हा विशाल भारत देशाच्या किनार्यावरील एक छोटासा बिंदू! पण गोव्याची ही आकारमूर्ती छोटी असली तरी कीर्ती मोठी आहे. या छोट्याशा जगप्रसिद्ध प्रदेशात भिन्न संस्कृतीचे, जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विश्वकर्म्याचा तिसरा पुत्र धर्मपाल आणि चोल राजाची कन्या चंद्रगुप्ता (काही ठिकाणी हे नाव चंद्रिका असे दिले आहे) यांना दोन पुत्र झाले. ते कालिका देवीच्या आज्ञेवरून कासे, तांबे वगैरे धातू बनवून त्यांची उपकरणे तयार करण्याची विद्या शिकले. त्यांनीच पुढे सर्वत्र या विद्येचा प्रसार केला. जे ही विद्या शिकले तेच कास्यकार किंवा कासार होत. ‘कास्यकार’ या शब्दावरून कासार हा शब्द आल्याचे मानले जाते. बळकट शरीरयष्टीचा, कधी उंच, गव्हाळ रंगाचे प्रमाणबद्ध अवयवांचे असलेला हा समाज अत्यंत अल्प तरीही गोमंतकाच्या संस्कृतीच्या उभारणीत कासार या समाजाचा मोठा भाग आहे. या जातीशिवाय गोव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन अधुरे आहे. सर्व समाजातील बायका निःसंकोचपणे आपला हात कासाराच्या हातात देतात, हे या जातीने आजवर हिरिरीने जपलेल्या विश्वासाचा हा परिपाक आहे. वेदकाळात काष्टकार व लोहकाराप्रमाणेच कास्यकारांचीही यज्ञकर्माला गरज होती. धातूची यज्ञपात्रे व इतर उपकरणे ते तयार करीत. यज्ञसंस्था बंद झाली तेव्हा ते संसारोपयोगी पात्रे बनवू लागले. हा समाज स्वभावाने कष्टाळू, पापभीरू आणि मितभाषी असल्यामुळे इतका अल्प असलेला सुसंस्कृत समाज इतरत्र क्वचितच असेल. महाराष्ट्रातील कासारांच्या कुलदेवी, बहिरी, चंडिका, एकवीरा, कुमारिका, खंडोबा, महालक्ष्मी वगैरे आहेत. गोव्यातील या जातीची कुलदेवी डिचोली तालुक्यातील ‘वन’ या गावातील कालिका देवी. ही अखिल गोवेकर कासार समाजाची प्रामुख्याने समाजदेवता आणि श्रद्धास्थान आहेच. तसेच शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील समाजातील भाविकांनाही हे देवस्थान आकर्षित करीत आहे. तल्लख बुद्धी आणि सामान्य ज्ञान या बळावर ४० वर्षांपूर्वी कासार समाजाच्या जीवनाला आणि विकासाला कलाटणी देणारे एक नवे नेतृत्व उदयाला आले आणि त्यांनी ‘वन’ या शांततामय व निसर्गरम्य अशा गावात कालिका देवांचे देवस्थान उभारले. त्यांचे हे कार्य अतुलनीय ठरले. कालांतराने ज्या वेगाने हे नेतृत्व उदयाला आले त्याच वेगाने ते लयास गेले. हे समाजाच्या दृष्टीने दुर्दैवी होते. कारण त्यांच्या पश्चात हे नेतृत्व समर्थपणे नेण्यास कुणीही पुढे आले नाही. कासारच नव्हे तर इतर जातीच्या परिश्रमपूर्वक सहभागातून आजचे हे कालिका देवस्थान आकारास आले आहे. त्यासाठी अनेक दानशूर लोकांनी मुक्त हस्ते देणग्या दिल्या. उदार मनाने जमीन दान दिली. गेल्या चाळीस वर्षांपासून या देवस्थानात अनेक उत्सव साजरे केले जातात. मात्र प्रामुख्याने ‘रथसप्तमी’ हा उत्सव प्रचंड उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. केवळ राज्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून या उत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी असते. या उत्सवाच्या निमित्ताने कासार समाजात एकोपा निर्माण होणे व त्यातून विचारांचे आदान-प्रदान होऊन एकप्रकारे धार्मिक आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित होत असल्यामुळे या उत्सवाला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
आपल्या चरितार्थासाठी आज हा समाज सर्वत्र विखुरलेला आहे. कासारात दोन तर्हेचे व्यवसाय आहेत. एकच व्यक्ती दोन व्यवसाय करीत नाही. परंतु एकाच घराण्यात दोन व्यवसाय करण्याची उदाहरणे आढळतात. पहिला तांबे, पितळ, काशाची भांडी बनविणारा तर काचेच्या बांगड्या घेऊन पाठीवर ओझे घेऊन वाड्यावाड्यावर फिरणारा! या बांगड्यांचा व्यवसाय करणारी कासार घराणी पूर्वी फोंडा तालुक्यातील केरी गावात अधिक असल्यामुळे त्या गावाला ‘काकणकेरी’ हे नाव पडले. गोव्यात केरीच्या बांगड्यांना फार मागणी असल्यामुळे ती विकण्यासाठी केरीचे कासार गोव्यात सर्वत्र हिंडत. आज नाना प्रकारच्या आकर्षक, चमकदार बांगड्या गोव्याबाहेर सहज उपलब्ध होत असल्यामुळे गोव्यातील साध्यासुध्या बांगड्यांचा घरोघरी चालणारा धंदा काळाच्या ओघात बसत चालला असला तरीही मोर्ले व साष्टीतील कुकळी या गावात अजूनही स्थानिक बांगड्या करण्याचा धंदा अस्तित्वात आहे. लग्नाच्या मोसमात चुडा भरण्यासाठी ख्रिस्ती व हिंदू या दोन्ही समाजात या गोव्यातल्याच बांगड्यांना खास मागणी असते. भांडी बनविणार्या कासारांची वसती गोव्यात अधिक प्रमाणात म्हापसा येथे आहे. याशिवाय डिचोली तालुक्यात वन, पिळगाव, कुडणे, सांगे तालुक्यात मोर्ले शिवाय कुकळी, बाळ्ळी, वेर्णे येथे त्याची थोडी वसती आहे. डिचोली येथील कासारांची पितळीची ‘झाडे’ (समस्या) तयार करण्याबद्दल प्रसिद्धी आहे. हा धंदा वंशपरंपरागत करीत असल्यामुळे या व्यवसायात ते कुशल बनले आहे. तांब्या-पितळीची भांडी करणार्यांना सर्वत्र गोव्यात ‘कासार’ किंवा ‘तांबट’ म्हणतात, परंतु बांगड्या करणार्या बार्देशमध्ये वळार, साष्टी, फोंडा व काणकोण तालुक्यात ‘काकणकार’, तर पेडणे तालुक्यात ‘कासार’ म्हटले जाते. या जातीचे संस्कार, धार्मिक चालीरीती, राहणी, धर्मकृत्ये ब्राह्मणासारखी आहेत. हा समाज शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो. तसाच तो बुद्धिजीवी आहे आणि बुद्धिमानही आहे. बुद्धीचा वापर करूनच ती जगली आणि जगत आहे. धर्मनिष्ठा परंपरेने जपणारी आणि तरीही सुधारणेस उन्मुख, धार्मिकदृष्ट्या सश्रद्ध, देवाधर्मावर विश्वास असलेला, संस्कार, कुळाचाराचे पालन करणारा असा आहे – संथ, संयत आहे हा समाज. या संथ जीवनात अनेक कासार समाजातील माणसात चैतन्य फुलले ते गोवा मुक्तीच्या लढ्यात. या चैतन्यात अनेकांनी आत्माहुती दिली.
आज विविध फॅशनच्या बांगड्या हे चलते नाणे असल्यामुळे या व्यवसायाला आज चांगले गिर्हाईक आहे आणि या धंद्यात प्रतिस्पर्धी नसल्यामुळे आज हा समाज आर्थिकदृष्ट्या थोडाफार संपन्न आहे. स्वातंत्र्यानंतर सगळ्यांना समान संधी उपलब्ध झाली तरीही तसा आज हा समाज शिक्षण, नेतृत्व व शासन या क्षेत्रात इतर समाजापेक्षा अजूनही पिछाडीवर आहे. तरीही तसा आता हा समाज संघटित होऊ लागला आणि आपला परंपरागत व्यवसाय करीत असूनही बदललेल्या परिस्थितीला सामोरे जात आहे. शिक्षण क्षेत्रात हळूहळू प्रगतीच्या मार्गावर आहे. शिक्षणाचा लाभ मुले आणि तरुण पिढी घेत असून त्यांनी अधिक शिक्षण घ्यावे असे समाजाचे प्रयत्न चालू आहेत.
या समाजातील व्यक्ती आज कुठल्याही क्षेत्रात उच्च पदावर नसल्यामुळे त्यांनाही समान संधी मिळवण्यासाठी अनुसूचित जातीत समावेश करावा अशा तर्हेची चळवळ त्यांनी उभारलेली नसली तरी अनेक वर्षांपासून त्यांचे प्रयत्न आहेत. तसे झाले तर बरे दिवस येतील. इतर समाजाची आज प्रगतीच्या मार्गाने घोडदौड चालू असताना कासार समाजाची नोंदणी झालेली संस्था किंवा संघटना नाही, समाजाचे असे स्वतःचे सभागृह नाही. आज अनेक ज्ञातींनी सहकार क्षेत्रात दिमाखात प्रवेश केला आहे. परंतु अजूनही हा समाज अजून आपली स्वतःची पतसंस्था अथवा सहकारी बँक स्थापण्यापासून चार हात दूरच राहिली आहे, हे दुर्दैवी असले तरीही आजची वस्तुस्थिती आहे.
या समाजात जातीय ऐक्य आहे परंतु शिक्षणाच्या अभावी त्यांना त्यांची जाणीव नव्हती आणि समाजाला पणजीपर्यंत गार्हाणी पोचवणारे नेतृत्व आजपर्यंत लाभले नव्हते. परंतु आता हा समाज संघटित आहे. सामाजिक कार्य करणार्या संस्थाही या दृष्टीने कार्यरत आहेत.
समाजातील गरजू होतकरू मुलांना शिक्षण क्षेत्रात सवलत, नोकर्यात आरक्षण, आर्थिक साहाय्य मिळून त्यांची उन्नती घडवून आणण्यासाठी अनुसूचित जातीत समावेश आवश्यक आहे. आज हा समाज पिढीजात व्यवसायाची जोपासना करीत आहे. सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्व पातळीवर प्रतिष्ठा मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहे ही समाजाच्या हिताच्या दृष्टीने सुचिन्हे आहेत.