त्या काळातले खेळ

0
1048

– संदीप मणेरीकर
‘कबड्डी, कबड्डी, कबड्डीऽऽऽऽ कबड्डीऽऽऽ’ अख्ख्या आवाठातून आवाज घुमत होता.
या आवाजाबरोबरच ‘आडवो घाल मरे तेका, ओड तुज्याकडे’ ‘अरे जरा ये फुडे इलय हो बग रेषेकडे’, ‘तीन जाण आसत रे, तिगांकाय घेवन ये’ असे परस्पर विरोधी स्वर घुमू लागले. आवाठातील भाटल्यात गोपलो, घनःश्याम, उमा, हनगो, असे तगडे खेळाडू कबड्डी खेळत होते. दोन गटांतील हा कबड्डीचा सामना चांगलाच रंगात आला होता. मी त्यावेळी लहान असल्यामुळे असल्या खेळात आम्हांला किंमत नव्हती. त्यामुळे साहाजिकच मी बाजूला पडलो होतो. पण त्यांचा खेळ पहात होतो. आवाठात असताना आम्ही असे कितीतरी खेळ खेळत होतो. घरी आल्यानंतर मी आणि भाई (माझा मोठा भाऊ) आम्ही दोघे बहुतेक अंगणात कबड्डी खेळत असू. शेणानं सारवलेलं अंगण आणि वर मंडप असल्यामुळे कबड्डी खेळायला काहीच वाटत नव्हतं. त्यामुळे सहजच आम्ही खेळत असू. खेळताना पडलो किंवा ओढत गेलो, सरपटत गेलो तरीही काहीही लागत नव्हतं. कपडे खराब होत होते, पण त्याचा आमच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. घरातून कोणीतरी ओरडत होतं, पण त्याचा आमच्या खेळावर कधी परिणाम झाला नाही.
मात्र त्यावेळी हुतूतूतू तूतू तूतू करत कितीतरी वेळ आम्ही दम धरत होतो. अर्थात तसा दम धरता येत नव्हता. पण धरलेला आहे असं आम्ही दाखवत होतो. सीमारेषेकडे पोहोचेपर्यंत दमछाक व्हायची, दोघांचीही. पण माघार घेणे हे रक्तातच नव्हतं. त्यामुळे एकच डाव कितीतरी वेळ चालायचा. शेवटी मग कधीतरी कुणीतरी जिंकायचा.
त्यावेळी आम्ही काहीतरी म्हणत असू, ‘सुईचा धागा, सुई टोपेना सुई, सुई सुई…’ असलं काहीतरी निरर्थक म्हणत हा कबड्डीचा डाव चालायचा. त्याचा अर्थ काही लागला नाही आणि आता त्याचा विचार केला तर हसू येतं. त्यावेळी काय म्हणत होतो आपण असा विचार मनात येतो. आवाठातील लोकांप्रमाणे आमची एकमेकांसोबत दांडगाई चालायची. पण ती केवळ दोघांपुरतीच मर्यादित होती.
आवाठात कधीतरी मग मध्येच विटी दांडूचा खेळ रंगत असे. विटी दांडूला मालवणी भाषेत ‘कोळंडेबार’ असं म्हणत. विटी, दांडू आणि ती विटी दूर फेकण्यासाठी असलेल्या काठीला पेलकी असं म्हणत. विटी त्या काठीने फेकताना ‘पेले’ असं म्हणून विचारायचं असतं. त्यानंतर त्यांनी पेले म्हणून सांगितल्यावर दूरवर ती विटी फेकायची. तिचा झेल घेतला तर तो खेळाडू बाद अन्यथा जिथे ती विटी पडलेली असेल तिथून ती आडव्या ठेवलेल्या दांडूवर फेकायची. तिच्यावर बसली तरीही हा खेळाडू बाद नाही तर त्या दांडूने ती विटी परत हात न लावता दूर फेकायची वगैरे असा तो खेळ. या खेळाने ती विटी डोळ्यांवर बसण्याची शक्यता मोठी असते. पण आम्ही खेळत असताना आम्हांला काही तसा कोणालाच अपघात झालेला नव्हता. मध्येच कधीतरी ‘आगगाडीच्या डब्यामध्ये बसली होती राणी
तिने मला विचारले ‘वॉट इज धीस?
मी तिला उत्तर दिले – ‘कोंबडीचे पीस.’ अशा रितीने डाव घातले जात असत.
लहान असताना शाळेत किंवा शनिवार, रविवारी आम्ही आवाठातले सारे ‘पोरं’ लंगडीही खेळत असू. यात मुले विरुद्ध मुली असाही कधी कधी सामना रंगायचा. त्यात आम्ही मुलगे बहुतेक हरत असू. कारण मुलींचा लंगडी हा स्पेशल खेळ असायचा. मध्येच एखादी मुलगी कधी पाय टेकवून दुसर्‍या पायाने लंगडी घालायची हे आम्हांला कळतही नव्हतं. आमच्या डोळ्यांत त्या मुली सहजपणे धूळ फेकत असत. आणि आम्ही लंगडी घालून त्यांना पकडायचं असे तेव्हा त्या अशा रितीनं पळत असत की जणू अंगात वारे संचारलेले आहे. त्यांचा तो रोजचा खेळ असल्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध हरत असू. मात्र आम्हांला त्याचं काही विशेष वाटत नसे.
त्यांचा दुसरा खेळ म्हणजे दोरी उड्या. हा खेळ मुलींचा नेहमीच चालत असे. प्रत्येकाच्या दप्तरात अशी दोरी असायची. आम्ही मात्र हा खेळ कधी खेळलो नाही. पण आम्ही गंमत म्हणून दोरी उड्या मारलेल्या आहेत. अर्थात मुलींच्या सारख्या कधी जमल्याही नाहीत.
प्राथमिक शाळेत असताना म्हणजे आमच्या गावातल्या, वाडीतल्या चौथीपर्यंतच्या शाळेत असताना एक खेळ खेळत होतो. टिकली मारून जावे.. यात एका मुलाचे, मुलीचे पाठीमागून एकाने डोळे बंद करायचे, उर्वरीत खेळाडूंना नावं दिलेली असतात. फुलांची, फळांची वगैरे., त्यानंतर ज्याने डोळे झाकलेले असतात त्याने म्हणायचं, ‘गुलाबाने यावे, टिकली मारून जावे, हसू नये, बोलू नये गुपचूप रहावे’ त्यानंतर मग ज्याचं नाव गुलाब असेल त्याने येऊन डोळे बंद केलेल्या मुलाच्या भालप्रदेशावर टिचकी मारून जायचं. मग डोळे उघडले गेल्यावर त्यानं आपल्यावर कोणी टिचकी मारली हे शोधून काढायचं. जर शोधलं तर त्याच्यावर राज्य आलं. असा हा खेळ. याशिवाय आम्ही आणखी एक खेळ खेळत असू. तो अद्याप तसा थोड्याफार प्रमाणात चालत आहे. आईचा रुमाल हरवला. सगळ्या खेळाडूंनी गोल बसायचं आणि एकाने त्याच्यामागून फिरायचं, हातात रुमाल घेऊन. आणि तोंडाने ‘आईचा रुमाल हरवला’ असं म्हणायचं. इतरांनी आम्ही नाही पाहिला असं म्हणायचं. मग मध्येच तो रुमाल कोणाच्या तरी पाठीमागे टाकायचा. आणि परत त्याच्याकडे येईपर्यंत तो रुमाल त्याच्या मागे आहे याची जाणीवही त्याला होऊ द्यायची नाही. आणि मग त्याच्या मागे येऊन त्याला त्याच रुमालाने बदडून काढायचं. आणि समजा त्याला कळलं की आपल्या मागे रुमाल टाकलेला आहे तर त्याने रुमाल टाकणार्‍या खेळाडूला बदडून काढायचं. आणि त्यांनी रिकाम्या झालेल्या जाग्यावर बसण्याचा प्रयत्न करायचा.
लगोरी हा एक खेळ, मी तो पाहिलेला आहे पण प्रत्यक्ष कधी खेळलेलो नाही. मुलींच्या खेळातील आणखी एक बैठा खेळ म्हणजे दगडांचा खेळ. पाच दगड घेऊन त्यांनी खेळायचं. त्याचे विविध प्रकार आहेत. आम्हीही तो खेळलेलो आहोत. पण बर्‍याच वेळा आम्हांला तो मुलींचा खेळ म्हणून तो खेळायला दिला जात नसे आणि कधी कधी तर तो भिकारडा खेळ असं म्हणून ते दगडही बाहेर फेकले जात असत. तसाच आणखी एकप्रकार म्हणजे खापर्‍यांनी खेळणे. फुटलेल्या कौलाचा एक तुकडा घ्यायचा. पाच चौकोन आखायचे, तो तुकडा हातात घेऊन एकच पाय जमिनीला टेकवून तो तुकडा प्रथम पहिल्या चौकोनात टाकायचा. त्यानंतर त्या चौकोनात पाय न ठेवता आणि लंगडी घालून पुढच्या चौकोनात जायचं.
खांबांनी खेळणे हाही एक प्रकार. आम्ही आमच्या अंगणात हा खेळ खेळलोय. पण जरा कमी प्रमाणात. डोंगर की पाणी हा एक आणखी वेगळा खेळ. हा कोणीही खेळायचा. म्हणजे मुलां-मुलींनी, उंच जागा म्हणजे डोंगर आणि सखल भाग म्हणजे पाणी. डोंगर मागितला तर डोंगरावरच रहायचं. पाण्यात उतरायचं नाही. पाण्यात असताना बाद करताना प्रयत्न करायचा.
यासाठीही काही नियम तयार केले होते. ‘एक पाऊल आऊट नाही’ हा नियम तर डाव घालतानाच केला जायचा. ‘आम्ही कुणाला भीत नाही, एक पाऊल आऊट नाही, डोंगर की पाणी?’ असं ज्याच्यावर राज्य आलेलं असेल त्याला विचारायचं. मग तो डोंगर की पाणी ते मागणार आणि मग खेळ सुरू.
तसाच आणखी एक खेळ म्हणजे विष-अमृत. ज्याच्यावर राज्य असेल त्याने इतरांना पकडायला जायचं. पकडताना त्या खेळाडून खाली बसायचं त्यावेळी पकडणार्‍यानं विष म्हणायचं. दुसर्‍यांना पकडायला जायचं.त्यावेळी इतर खेळांडूंपैकी कोणीतरी येऊन त्या बसलेल्या खेळाडूला हात लावून ‘अमृत’ असं म्हणणार. मग तो खेळाडू पुन्हा धावायला लागतो. हा खेळही मजेदार आणि रंगतदार असायचा. मुला-मुलींनी मिळून खेळायचा.
शाळेत काजू झाल्यावर मधल्या सुट्टीत काजूंनी खेळायचो आम्ही. त्यात मोठ्ठी काजू असेल त्याला भट्टा म्हणत. फारसं काही मी खेळलो नाही. पण थोडंफार खेळलोय. पण हा खेळ पाहिलेला आहे.
असे कितीतरी खेळ आज विस्मरणात जात आहेत. आजची मुलं हे कोणतेच खेळ खेळत नाहीत. संगणकावरील गेम्स किंवा क्रिकेट या यतिरिक्त कोणते खेळ त्यांना माहित असतील की नाही यात शंका आहे. टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉपच्या आजच्या या जमान्यात हे असले अस्सल मनोरंजन करणारे खेळ आणि मैदानी खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अस्सल ग्रामीण जीवनाचा आनंद या खेळांत होताच पण शारिरीक कमाई आणि बौद्धिक क्षमताही यामुळे वाढत होती. व्हिडीओ गेम्ससारख्या खेळांमुळे एकलकोंडेपणा वाढत चाललेला आहे. काल्पनिक जगाशी संबंध येत असल्यामुळे स्वप्नात रममाण होता येतं. त्यामुळे शारिरीक व्यायाम काहीच होत नाहीत. हालचाली होत नाहीत. बुद्धीही चालत नाही. अशा या अत्याधुनिक जगात मात्र अस्सल खेळांचे मोती ओघळत चालले आहेत.