तो आज येणारच…!

0
120

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
उगाचच वाटत होते.. हो, येणार तो! आज माझा वाढदिवस ना! मग येणारच तो.. तिचे मन तिला सांगत होते. तिला बजावत होते. तिला ते खरेही वाटत होते… पण दर्पणातील तिची छबी वेगळेच काहीतरी सांगत होती. तो येणार नाही. आठव…मागच्या वर्षी तू त्याची किती वाट बघितलीस.. संपूर्ण दिवस तू तुझ्या त्या व्हरांड्यातच उभी होतीस. आठवतेय ना तुला? मग…! परत आजही सकाळपासून तू व्हरांड्यातच उभी? लक्ष तरी कुठे आहे तुझे सकाळपासून .. अगदी रात्री १२ पासून फोन वर फोन येत आहेत. पण तू ना.. कुठेतरी हरवून गेलीस.. वेडे… खरेच तू हरवली…!
प्रेम करतेस ना तू त्याच्यावर… मग सांगून टाक..! छे, तेच तर जमत नाही. ती तिच्या छबीला म्हणाली, ‘‘मला नाही जमत त्याला सांगायला की मी त्याच्यावर प्रेम करते म्हणून! पण त्याने समजून घ्यायला हवे ना! तो आल्यावर माझ्या गालावर उमटलेली लाली त्याला दिसत नाही का? माझी नजर त्याच्या नजरेला भिडतच नाही.. कां? मी अशी अडलेली… तरीही त्याला आवडते..! मग सांगत कशाला नाही तो. अग, मागच्या वर्षी तो तुझ्या वाढदिवसाला नाही आला, त्याच्या अगोदरही नाही आला! या माझ्या छबीला काय झालेय..? संपूर्ण वर्षाची रोजनिशी लिहून ठेवली असावी. कुणी सांगितले ग तुला चोंबडेपणा करायला? नाही आला तो.. पण त्याअगोदर दरवर्षी तो यायचा.. हो ना! आता का दातखिळी बसली ग तुझी!खरेच, तो यायचा. मी घरी नसले तर माझ्या व्हरांड्याच्या समोर झाडाखाली तो थांबायचा. तो त्याची ती बाईक.. अगदी हेल्मेटसकट! तासन्‌तास वाट बघत राहायचा. कुणाच्या लक्षात यायला नको म्हणून परत जागा बदलायचा. मग तो नाक्यावर उभा असायचा. नाक्यावरून मी उतरून यायची. खुरडत खुरडत यायची! माझ्या वाढदिवसाअगोदर दररोज फोन करायचा..! मग वाढदिवसाचा दिवस यायचा. रात्री बारा वाजता पहिला फोन वाजायचा. मी हळूच रिंग कमी करायची. तरीही भाभीला जाग यायची. ‘‘कोण गं तो एवढ्या रात्री फोन करतोय?’’ मी म्हणायची, ‘‘माझी मैत्रीण’’ पलीकडून तो ते ऐकायचा… जोरात हसायचा! माझ्या वाढदिवसाला त्याच्या सदिच्छा पहिल्या असायच्या. त्याचा फोन अगोदर, नंतर बाकिच्यांचे, त्याचा फोन आल्यावर मग बाकिच्यांच्या फोनला ग्रीन सिग्नल ठरलेले.
त्या वर्षी दरवाजावरची बेल वाजली. दार उघडले तर दारात हा उभा… बरोबर परडीभर गुलाबांची फुले… लाल लाल .. सोबत केक… व मला आवडणार्‍या वस्तू! आमच्या घरात ही मंडळी… मला तर त्या दिवशी लाजच वाटली. मी स्वतःला ओढतच.. खुरडतच शेजारच्या खोलीत गेली. त्याची नजर मला शोधत होती… पण मी बाहेर गेलीच नाही!
घरची मंडळी हसली.. तोही लाजला. दिलेला चहा कसाबसा संपवत तो पळाला. मी व्हरांड्यात उभी राहिले. त्याच्या वर गेलेल्या हाताला माझ्याही हाताने बाय करत साथ दिली आणि माझा हात त्याला खुणेनेच विचारत होता… कधी येणार रे तू?
अगं बघताहेत लोक.. असे कसे विचारावे माणसाने.. मुलीला एकटीला एकांतात भेटायला कुणी मुलगा येतो का? अगं तो ‘‘कुणी’’ नाही हं, तुझ्यावर प्रेम करणारा.. कुणी कसा असणार. तो तुला एकांतात भेटायला हवा ना! मग सांग ना त्याला.. त्याचा फोन आल्यावर सांग… उद्या आपण अमुक वेळेला एकटी असेन! हे मी कसे सांगेन आणि एकांतात काही अघटित घडले तर..! मी त्याला आवडते… तोही मला आवडतो. मग असा दुरावा का? आपले मन मारून मी त्याच्यापासून दूर नाही राहू शकत.
दोन वर्षांपूर्वी एका लग्न समारंभात त्याची व माझी नजरानजर झाली. कुणास ठाऊक, त्याच्या नजरेत मला काहीतरी दिसले. मला वाटले तो गालातच हसला. कुणीतरी म्हटलंय ‘‘जन्मोजन्मीच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात.’’ खरे असेल का ते? बहुधा असावे. अगोदरच अवघडल्यासारखे झाले होते! तो एका नजरेत माझ्या प्रेमात तर पडला नसावा… पण मी अशी?
तोही तिच्याच कडे बघत होता. कोण असेल ती.. एवढी सुंदर… गोरी… हसताना गालावरची खळी आणखी गडद झालेली. कुणीतरी त्याला तिच्याकडे ओढून नेले होते. त्याच्या नकळत तो तिच्या पाठीमागच्या सीटवर बसला. त्याच्यात व तिच्यात थोडेच अंतर बाकी होते. पण तिच्या शेजारी कुणीतरी सदैव बसलेले असायचे. परत परत नजरा जुळत होत्या. नजरा बोलत होत्या. अरे… ये ना… बस ना शेजारी! तू काय म्हणालीस? छे.. मी नाही हं.. तूच काहीतरी म्हणाला असणार!
ती नवरदेवाची बहीण होती..! कुणीतरी धावत आले व तिला घेऊन गेले. ती संथ चालत होती… हळुवार लंगडत चालत होती. क्षणिक तिने त्याला मागे वळून पाहिले.. अरे, मी अशी अधू… बघून घे… मी तुला चालेल का? तुला तरीही आवडेल का? तो हिरमुसला… निघून गेला.
एवढी सुंदर.. पण नियतीने अपंग बनवलेली. तो लाचार झाला. स्वतःवरच तो रागावला. त्याने तसे निघून यायला नको होते. तो निघून गेला. तिची नजर त्याला शोधत होती. ‘‘लव्ह ऍट फर्स्ट साईट!’’ निघून गेलेला. तिला वाटत होते, तो परत येणार… व तो आलाही. घरचा पत्ता शोधत आला.. मला भेटला. माझ्याशी बोलला. घरच्या सर्वांना तो भेटला. घरच्या सर्वांना तो आवडला. बोलका होता. अगदी नजरेनेच बंदिस्त करणारा. मला मेल्यागत झाले होते. मी पांगळी… तो धडधाकट.. गोरा! चांगली धडधाकट मुलगी बायको म्हणून त्याला सहज मिळाली असती. पण हा आमच्या घराच्या चकरा मारत राहिला. मला भेटू लागला. हा मला धोका तर देणार नाही ना? खेळवत तर नसेल! असे अभद्र विचार तिच्या डोक्यात पिंगा घालत होते. मी ही लाचार होते.
अगं मी प्रेम करतोय तुझ्यावर..! रात्री त्याचाच फोन आला होता. तिच्या अंगावर काटा उभा राहिला. तारुण्याचा बहर ओतू पाहत होता. ती घरी एकटीच होती. घरची सारी मंडळी नातेवाइकांकडे कार्यक्रमाला गेली होती. आल्यावर घरी वाढदिवस साजरा होणार होता. तिला वाटत होते, तो येणार..!
दरवाजावरची बेल वाजली. खुरडत खुरडत तिने दरवाजा उघडला. तो तोच होता. हातात लाल गुलाबाची परडी! तिचे गाल लाल झाले होते. तो आत आला. दरवाजा बंद केला. हळुवारपणे तिच्या हातात ती परडी दिली. तिला वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या. तिची छाती धडधडत होती. तिला त्याने आपल्या कवेत घेतली व तीही त्याच्या मिठीत शिरली. तिच्या थरथरणार्‍या अधरावर त्याने आपले अधर ठेवले.
‘‘कुठे होतास रे तू… आजच माझी आठवण आली…’’ नजरेनेच बोलणी चालू होती. कुणीही बोलत नव्हते. दोघेही जण एकमेकांच्या मिठीत न्हाऊन जात होती. मिठी घट्ट होत चाललेली.. भेटीचा आनंद… चेहर्‍यावरची तृप्ती.. अंगावरचा बहर अंगाला जाळत होता. दोघांच्याही काया पेटलेल्या!
अगं, मी ना तुझाच आहे..!