‘स्वाईन फ्लू’चे दोन संशयित रुग्ण सापडले

0
92

एक रुग्ण गोमंतकीय; आरोग्य खाते सज्ज
स्वाईन फ्लू या रोगाची लागण झाल्याचा संशय असलेले दोन रुग्ण गोव्यात सापडले असून त्यातील एक गोमंतकीय असल्याची माहिती आरोग्यमंत्री फ्रांसिस डिसौझा यांनी काल दिली. आंध्र प्रदेश व तेलंगणमध्ये जानेवारीपासून या रोगाने थैमान घातले असून या वृत्तामुळे गोंमतकीय जनतेमध्ये घबराट पसरली आहे.वरील दोघेही जण विदेशातून गोव्यात आले होते. संशयित रुग्णांमध्ये एक महिला असून या दोघांवरही खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. महिला रुग्णाला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. दुसर्‍या रुग्णावर मडगाव येथील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहे. सदर रुग्ण हॉंगकॉंग येथून नोकरीवरून परतल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य खात्यात सर्व सुविधा व औषधे उपलब्ध असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. लोकांनी घाबरण्याचे कारण नसून ताप आणि अस्वस्थ वाटल्यास लगेच डॉक्टरांकडून तपासणी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री डिसौझा यांनी केले आहे. वेळीच उपचार घेतल्यास हा रोग पूर्ण बरा होऊ शकतो असे ते म्हणाले.
दरम्यान, आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे सुमारे १७३ रुग्ण आढळले असून ७ जण दगावले आहेत. ही राज्यांतील लोकांची गोव्यात सतत ये-जा असल्याने जनतेत चिंता पसरली आहे.