टाटा सफारी दरीत कोसळून चोर्ला घाटात एक जागीच ठार

0
145
दरीत कोसळलेली टाटा सफारी.

वळणाचा अंदाज न आल्याने अपघात
चोर्ला घाटात काल झालेल्या अपघातात फ्रान्सिस्को झेवियर आल्मेदा (६९) हे कोलवा-सालसेत येथील गृहस्थ जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा लिगोरो आल्मेदा हा जखमी झाला. हा अपघात दुपारी सव्वादोन वाजता झाला.दोघेही जीए ०८ ई ४०६१ क्रमांकाची टाटा सफारी घेऊन चोर्ला घाट उतरत होते. त्यावेळी वळणाचा अंदाज न आल्याने गाडीवरील ताबा सुटून गाडीने प्रथम झाडाला धडक दिल्यानंतर ८० मीटर खोल दरीत कोसळली. त्यावेळी लिगोरोच्या वडिलांचे जागीच निधन झाले. जखमी अवस्थेत लिगारो हा गाडीतून बाहेर आला व ८० मीटर दरीतून चढत मुख्य रस्त्यावर आला आणि रस्त्यावरून जाण्याच्या वाहनांना मदतीसाठी बोलाविले. त्यानंतर काही जणांनी त्याला मदत करून वाळपई पोलीस व वाळपई अग्निशामक दलाला माहिती दिली.
वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला. जखमी लिगोरो हा अपोलो इस्पितळात उपचार घेत आहे. मृत फ्रान्सिस्को यांचा मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉ येथे पाठविण्यात आला आहे. मृत्यूचा घाट
बेळगाव ते गोवा महामार्गात लागणारा चोर्ला घाट दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असून चोर्ला घाटात असणार्‍या वळणांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. गोव्याबाहेरून येणारे पर्यटक हे दारूच्या नशेत वाहने चालवित असल्याने अपघात घडत आहेत. गोव्याबाहेरून येणारे पर्यटक सुर्ला गावात मद्य प्राशन करून येत असतात आणि त्यानंतर घाट उतरत असतेवेळी अनेक अपघात होत असतात. या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक व पोलीस खात्याने कारवाई करावी, अशी मागणी आहे.