आचार्य अत्रे यांंनी लिहिलेले ‘तो मी नव्हेच’ हे नाटक बहुतेकांना माहीतच असेल. त्यामध्ये सहा विविध वेशांत वावरुन ङ्गसवणूक करणारा भामटा दाखवला आहे. सध्या ओळख-पडताळणीची विविध प्रगत तंत्रे अस्तित्वात आल्यामुळे एका वेळी अनेक व्यक्तिमत्वे साकारणे अशा लोकांना जरा अवघड बनले आहे म्हणा, परंतु त्यावरही कुरघोडी करण्याचे त्यांचे प्रयत्न सतत चालू असतात! अशांना कधीमधी यश आल्याचेही आपण वृत्तपत्रांत वाचतो. असे झाले की पडताळणी-तंत्रात सुधारणा केली जाते आणि (सॉफ्टवेअर-रायटर्स आणि हॅकर्स ह्यांमधील शर्यतीप्रमाणेच) एकमेकांच्या पुढे राहण्याची ही स्पर्धाही चालूच राहाते! ओळख-पडताळणीची प्रमुख साधने म्हणजे हातांच्या बोटांवरील रेषा, डोळ्यांतील पटलाची (रेटिना) प्रतिमा आणि इतर काही दृश्य शारीरिक वैशिष्ट्ये वा खुणा. आता ह्यांमध्ये आणखी एका बाबीची भर पडली आहे आणि हे तंत्र विकसित करण्यामागे भारतीय शास्त्रज्ञांचा ङ्गार मोठा वाटा आहे.प्रत्येकाच्या डोळ्यांची अंतर्रचना अद्वितीय असल्याने नेत्रपटलाच्या (रेटिना) प्रतिमेचा वापर ओळख-पडताळणीसाठी केला जातो. शारीरिक वैशिष्ट्यांचा वापर करण्याच्या ह्या तंत्राला ‘बायोमेट्री’ असे म्हणतात. ह्या बाबी ‘आधार’ कार्डाशी संबंध आलेल्या सर्वांनाच बर्यापैकी माहित झाल्या आहेत. आता कोलकात्यामधील जाधवपूर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक नवेच तंत्र विकसित केले आहे आणि त्याची अचूकता ९७ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे असा त्यांचा दावा आहे. हे तंत्र चेहर्यावरील दृश्य खुणांनी ओळख पटवीत नाही तर चेहर्याखालील रक्तवाहिन्यांच्या रचनेवरुन!! आश्चर्य वाटले ना? परंतु प्रत्येकाच्या बोटांवरील रेषांप्रमाणेच (किंवा त्यांच्याइतकेच) चेहर्याच्या त्वचेखालील रक्तवाहिन्यांचे जाळेही अद्वितीय असते आणि ते देखील बदलत नाही असे संबंधित संशोधकांचे म्हणणे आहे. हे तंत्र वापरात आणण्यासाठी प्रथम संबंधित व्यक्तीच्या चेहर्याचचे ‘इन्ङ्ग्रारेड स्कॅनिंग’ केले जाते. ह्याकरिता ‘थर्मल इमेजिंग’ ही पद्धत वापरली जाते म्हणजेच उष्णतेच्या पातळ्यांमधील सूक्ष्म ङ्गरकांवरुन प्रतिमा बनवली जाते (जाताजाता – हॉलिवूडनिर्मित विज्ञान- तसेच भयपटांमध्ये हे तंत्र वापरल्याचे बरेचदा दाखवलेले असते, उदा. अर्नांल्डचा ‘प्रीडेटर’). एका विशिष्ट संगणकीय आज्ञावली आणि सॉफ्टवेअर द्वारे ह्या प्रतिमेचे विश्लेषण करून चेहर्यातील सर्व रक्तवाहिन्यांचे (सर्व म्हणजे सर्व – अगदी केशनलिका म्हणजे कॅपिलरींसहित!) जाळे रेकॉर्डवर आणले जाते. अशा प्रकारे चेहर्यांरवचे एक त्रिमिती-चित्रच सादर केले जाते – बाहेरील आवरण उर्ङ्ग कातडीशिवाय!! रक्तवाहिन्यांचे हे जाळे इतके गुंतागुंतीचे असते की परिणामी हे चित्र ‘बीट’ करणे भल्याभल्या चोरांना शक्य नाही असे ह्यांचे म्हणणे आहे. अर्थात इतर बायोमट्रिक पडताळणी-तंत्रांसोबत ह्याचा वापर केल्यास अचूकता १०० टक्के राहील असेही त्यांना वाटते.
परंतु इतकी सारी प्रगती झाली असली तरी बोटांचे ठसे उर्ङ्ग अंगुलिमुद्रा म्हणजेच ङ्गिंगरप्रिंट्सना पर्याय नाही हे खरे! शिवाय गेल्या काही वर्षांत व्यक्तीच्या हस्तरेषांवरुन देखील तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच माहिती मिळवणे शक्य होत आहे – ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष एवढेच नाही तर ती शाकाहारी आहे की मांसाहारी, तिने नजीकच्या भूतकाळात हाताळलेल्या वस्तू, तिचे साधारण वय आणि मूळ वंशसुद्धा!! कसे ते पाहू.
आपल्या बोटांवरील रेषांचे ठसे उमटतात, कारण बोटांना थोडेङ्गार का होईना तेल लागलेले असते तसेच इतरही काही रासायनिक द्रव्ये चिकटलेली असतात. अतिशय सूक्ष्म प्रमाणात असलेल्या ह्या द्रव्यांचे विश्लेषण करण्याचे तंत्र गेल्या काही वर्षांत प्रगत झाल्यामुळेच, निव्वळ एका ङ्गिंगरप्रिंटवरुन, संबंधित व्यक्तीची इतकी माहिती मिळवणे शक्य झाले आहे. ह्या तंत्राला ‘स्पेक्ट्रोस्कोपिक ऍनालिसिस’ असे म्हणतात. सापडलेल्या ठशावर उपारुण (इन्ङ्ग्रारेड) किरणांचा मारा केला जातो. ह्यामुळे ठशामधील विविध द्रव्यांचे रेणू स्वतंत्रपणे ओळखून त्यांचे एक तपशीलवार रासायनिक चित्र तयार करता येते. (ही प्रणाली ह्याआधी अमेरिकन लष्कराद्वारे क्षेपणास्त्र-तंत्रज्ञानामध्ये वापरली जात असे!) ह्याबाबतची अधिक माहिती ‘जर्नल ऑङ्ग ऍनालिटिकल केमिस्ट्री’ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ठशामध्ये आढळणारी ही द्रव्ये एक दशलक्षांश ग्रॅम (अथवा मिली) एवढ्या कमी प्रमाणात असतात, तरी देखील त्यांवरुन निष्कर्ष काढता येतात! उदा. ह्या द्रव्यांमध्ये युरियाचा समावेश ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास तो ठसा पुरुषाच्या बोटाचा असतो. किंवा विशिष्ट अमिनो आम्ले आढळल्यास ती व्यक्ती मांसाहारी आहे वा कसे हे सांगता येते. काही काळानंतर ठसा हवेच्या व इतर परिणामांमुळे धूसर होत असला तरी – त्यामधील उरलेल्या द्रव्यांवरुनही – तो किती जुना आहे हे ठरवता येते. असो. परंतु हे तंत्र सगळीकडेच मिळू शकत नसले तर मात्र बोटांचे ठसे उचलण्यासाठी वापरल्या जाणार्या पारंपारिक ‘पावडर’ प्रणालीच्या मर्यादा लगेच दिसून येतात.‘सीआयडी’ मालिकेत किंवा एकंदरीने चित्रपटांत दाखवतात, त्याप्रमाणे क्राइम सीनवर गुन्हेगाराच्या बोटांचे ठसे मिळवणे मुळीच सोपे नसते व मिळालेल्या एकूण प्रिंट्सपैकी १० टक्केसुद्धा उपयुक्त नसतात! दोन वर्षांपूर्वी माझ्याच मित्राकडे झालेल्या घरङ्गोडीत (पारंपरिक पद्धतीने) ङ्गक्त दोन ठसे मिळवता आले आणि तेही इतके पुसट होते की त्यांचा तपासकामात काहीच उपयोग नव्हता. ह्याचे कारण ठशामध्ये असलेले घाम, तेल व इतर रासायनिक द्रव्यांचे प्रमाण. वाचक म्हणतील ‘अरेच्च्या आत्ताच आपण ह्या द्रव्यांच्या उपयुक्ततेबाबत वाचले आणि? तुमची शंका योग्य आहे. पारंपारिक पद्धतीने माहिती मिळवताना रासायनिक द्रव्यांचा होणारा अडथळा लक्षात घेऊनच (काट्याने काटा म्हणतात तशी) नवी तंत्रे विकसित केली गेली. यूके तसेच ङ्ग्रान्समधील आणि इतर काही संस्थांमधील संशोधकांनी एकत्र येऊन पावडरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आहे-‘इलेक्ट्रोक्रोमिक’ प्रकारची ङ्गिल्म उर्ङ्ग थर. जेथून ठसा ‘उचलायचा’ आहे त्या वस्तूवर ह्या ङ्गिल्मचे आवरण चढवले जाते व त्यामधून विद्युतप्रवाह सोडला जातो. पारंपरिक प्रणालीनुसार ठशामधील रासायनिक द्रव्यांना पावडर चिकटते व त्यामधून रेषांचे चित्र मिळते. याउलट ह्या पद्धतीमध्ये, हीच रासायनिक द्रव्ये, ङ्गिल्ममधून वाहणार्या वीजप्रवाहाला अडथळा करतात व ह्या अडथळारूपी रेषा प्रतिमेत दर्शवल्या जातात. शिवाय ह्या ङ्गिल्ममध्ये ‘फ्लुरोफ्लोर’ प्रकारचे रासायनिक रेणू मिसळता येतात ज्यायोगे ह्या रेषा (घड्याळाच्या काट्यांमधील रेडिअमप्रमाणे) चमकतात व अशा रीतीने ठशाची दृश्य प्रतिमाही मिळू शकते. बरे ह्या प्रणालीत ठशात समाविष्ट असलेल्या रसायनांना धक्का पोचत नसल्याने वर उल्लेखलेली विश्लेषणात्मक पद्धतदेखील वापरता येईलच. एकंदरीत काय, गुन्हेगारी वाढत असल्यामुळे ओळख-पडताळणीची देखील सातत्याने अधिक गरज भासू लागली आहे. ह्यासाठी नवनव्या पद्धतींचा शोध घेतला जात आहे. ह्यामध्ये आता नॅनोटेक्नॉलॉजीचेही सहाय्य घेतले जात आहे.