राज्य पातळीवरील कार्निव्हल १४ फेब्रुवारीपासून होत असून १४ रोजी पणजीतून त्याचा शुभारंभ होणार आहे. गोवा पर्यटन खाते व पर्यटन विकास महामंडळ यांच्या विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. १५ रोजी मडगांव येथे तर १६ रोजी वास्को, कुडचडे व शिरोडा येेथे कार्निव्हल होणार आहे. म्हापसा व फोंडा येथे १७ फेब्रुवारी रोजी कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा कार्निव्हलच्या आयोजनासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणून ऍडव्हर्टइझिंग असोसिएट्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या महोत्सवातील चित्ररथ हे सामाजिक-सांस्कृतिक, पर्यावरण व पर्यटन या विषयांवर आधारित असावेत अशी सूचना पर्यटन खात्याने केलेली आहे. कार्निव्हलसाठी मार्गदर्शक तत्वे ठरवण्यास खात्याने एक समितीही स्थापन केली आहे. कार्निव्हलच्या चित्ररथ मिरवणुकीसंबंधी सर्व बाबी निश्चित करण्यासाठी या समितीची १७ जानेवारी रोजी एक बैठक होणार आहे.