सरकारकडून फसवणूक झाल्याचा सुरक्षा रक्षकांचा दावा

0
76

विविध सरकारी खाती व महामंडळे यात सुरक्षा रक्षक व सुपरवायजर म्हणून काम करणारे जे कर्मचारी संपावर गेले होते त्यांना मानव संसाधन विकास महामंडळाखाली सेवेत घेऊन कायम करण्याचे आश्‍वासन देऊनही सरकारने त्यांची फसवणूक केल्याचे सांगून या पार्श्‍वभूमीवर २१ जानेवारी रोजी पणजीत निदर्शने करण्यात येणार असल्याचे कामगार नेते ऍड. अजितसिंह राणे यानी काल पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, ५०० जणांची भरती करण्यात आलेली असली तरी भरती केलेल्यांपैकी बहुतेक जण हे नवे असून संपावर गेलेल्या पैकी केवळ २५ ते ३० जणांना सेवेत घेण्यात आले आहे, असे राणे यांनी सांगितले. आपणाला नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मानव संसाधन विकास महामंडळाची सेवेत घेऊन कायम करण्यात यावे यासाठी सुमारे ५०० जण संपावर गेले होते. वरील मागण्यांसाठी त्यानी आमरण उपोषणही सुरू केले होते.
या पार्श्‍वभूमीवर सरकारने त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यानी मध्यस्थी केली होती. सरकार सर्व मागण्या मान्य करील याची जबाबदारी मी घेतो असे त्यांनी सांगितल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता. मात्र, आता बहुतेक जणांना डावलून नव्या उमेदवारांची भरती करण्यात आली असल्याचे राणे यांनी सांगितले व या पार्श्‍वभूमीवर २१ जानेवारी रोजी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. पुढील कृती नंतर ठरवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.