किरण बेदी भाजपात

0
91
भाजपच्या मुख्यालयात आयोजित सोहळ्यात किरण बेदी यांचे भाजपातील प्रवेशाबद्दल स्वागत करताना भाजपाध्यक्ष अमित शहा. बाजूस केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली.

केजरीवाल विरोधात उमेदवारी शक्य
निवृत्त पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपाध्यक्ष अमित शहा व केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत बेदी भाजपवासी झाल्या.
दिल्ली विधानसभेसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून श्रीमती बेदी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वरील नेत्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी बेदी यांचे पक्षात स्वागत केले. ‘भाजपात मी किरण बेदी यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांच्या या प्रवेशामुळे दिल्ली भाजप अधिक मजबूत होणार आहे. त्या भाजपतर्फे नक्कीच निवडणूक लढवतील. मात्र यावेळी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल हे ठरविण्याचा अधिकार पक्षाच्या संसदीय मंडळाकडे आहे’, असे शहा यांनी स्पष्ट केले. अजून श्रीमती बेदी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील ते जाहीर झाले नसले तरी त्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभ्या ठाकतील अशी चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांनी म्हटले होते की दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून आपल्याला प्रस्ताव दिल्यास आपण तयार आहे. भाजप प्रवेशासंदर्भात बोलताना बेदी यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. मोदी यांनी स्फूर्ती दिल्यामुळेच आपण भाजपात आल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी आपल्यावर विश्‍वास दाखविल्याबद्दल आपण त्यांची आभारी आहे, असे त्या म्हणाल्या.
बेदींचा भाजपप्रवेश धक्कादायक : कॉंग्रेस
केजरीवालांकडून स्वागत
किरण बेदी यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेसने धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. श्रीमती बेदी व अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकांमुळे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चळवळीच्या भूमिकेविषयी प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे, असे मतप्रदर्शन कॉंग्रेसचे महासचिव अजय माकन यांनी केले आहे.
माकन हे दिल्ली विधानसभेसाठी कॉंग्रेसचे निवडणूक मोहीम प्रमुखही आहेत. बेदी यांचा भाजप प्रवेश धक्कादायक व दु:खही असल्याचे ते म्हणाले. बेदी व केजरीवाल यांनी वरील चळवळीचे महत्व कमी केल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी किरण बेदी यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत केले आहे.