दहा लाखांना घातला गंडा
येथील धेंपो हाऊसजवळ दोन पुरुष व एका महिलेने आपणाला सोन्याचा हार असल्याचे सांगून खोटा हार देऊन १० लाख रु. ना गंडा घातल्याची तक्रार खोर्ली-बार्देश येथील सुनील वेर्णेकर यांनी पणजी पोलिसात नोंदवली आहे. नंतर सदर हार तपासला असता तो खोटा असल्याचे दिसून आल्याचे वेर्णेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.वरील तिन्ही व्यक्ती ३० ते ३५ या वयोगटातील असल्याचे त्यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
सुनील वेर्णेकर यांचे म्हापसा येथे सराफी दुकान असून वरील व्यक्ती पूर्वी तेथे गेल्या होत्या. त्यावेळी या व्यक्तींनी त्यांना काही नाणी दिली होती. नंतर त्याला फोन करून मोबाईलवरून पणजीला बोलावले व त्याला सोन्याचा एक मोठा हार दाखवला व दहा लाख रु. ला तो विकायचा असल्याचे सांगितले. तो हार दहा लाख रु. ला घेतल्यास आपणाला खूप फायदा होईल या आशेने वेर्णेकर यानी रोख १० लाख रु. देऊन तो विकत घेतला. त्यापूर्वी सदर व्यक्तींनी खर्या सोन्याचे काही तुकडे केरकर यांना दाखवले होते. घाई गडबडीत वेर्णेकर हे हार खरेदी करून निघून गेले व दुकानात जाऊन तो तपासून पाहिला असता ते सोने नसल्याचे त्याला दिसून आले. नंतर त्यानी यासंबंधी पणजी पोलिसात तक्रार नोंदवली.
पणजी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.