ग्रंथप्रदर्शन, गौरवग्रंथ, टपाल आवरणाचे प्रकाशन
गोमंतकीय संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांच्या त्रिशताब्दीनिमित्ताने त्यांच्यावर खास टपाल आवरण जारी करण्यात येणार असून त्याचे अनावरण येत्या २१ जानेवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने कला अकादमीच्या दर्यासंगमावर २१ ते २५ जानेवारीदरम्यान संत सोहिरोबानाथ ग्रंथ प्रदर्शन व कला अकादमीत भक्तीसंगीत संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. पेडणे येथील सरकारी महाविद्यालयाचे नामकरण अलीकडेच संत सोहिरोबानाथ महाविद्यालय असे करण्यात आलेले आहे. तेथे सोहिरोबानाथांचा पुतळा उभारला जाणार आहे. सोहिरोबांच्या निवडक कवितांचे भाषांतर डॉ. भालचंद्र नेमाडे इंग्रजीत करणार असून सोहिरोबांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने एका गौरवग्रंथाचे व संत सोहिरोबानाथांच्या समग्र साहित्याचे संकलन करण्यात येत असून त्याचे संपादन दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
संत सोहिरोबानाथांचे तैलचित्र बनवले जात असून त्याचे वितरण केले जाणार आहे. गोवा विद्यापीठाजवळून जाणार्या महामार्गालाही सोहिरोबांचे नाव देण्यात येणार आहे.
संत सोहिरोबानाथ त्रिशताब्दी समितीची बैठक काल सचिवालयात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कला व संस्कृती खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर, तसेच समितीचे प्रा. अनिल सामंत, सागर जावडेकर, अशोक नाईक तुयेकर, डॉ. सचिन कांदोळकर, डॉ. नंदकुमार कामत आदी विविध सदस्य, कला व संस्कृती संचालक प्रसाद लोलयेकर आणि राजभाषा संचालक डॉ. प्रकाश वजरीकर उपस्थित होते. समितीचे प्रवक्ते म्हणून प्रसाद लोलयेकर यांच्यावर जबाबदारही सोपवण्यात आली आहे.