श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालीक यांनी गोव्यात शाखा सुरू करण्याचे मनसुबे जाहीर करून काही तासांच्या आतच काल राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या संघटनेवरील बंदी आणखी सहा महिने वाढविणार असल्याचे जाहीर केले.‘श्रीराम सेनेवरील बंदी आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यात येणार आहे. या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदीची मुदत गेल्या डिसेंबरमध्ये संपली असल्याची आपल्याला कल्पना नव्हती. मात्र काही माध्यमांनी ही बाब लक्षात आणून दिली’, असे पार्सेकर यांनी पणजीत मुख्य माहिती आयुक्तांच्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभावेळी सांगितले.
मंगळूर येथे २००९ साली एका पबच्या ठिकाणी तरुण-तरुणींवर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर ही संघटना वादग्रस्त ठरली होती. गोव्यात या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदीची मुदत गेल्या डिसेंबरमध्ये संपण्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रमोद मुतालीक यांनी गोव्यात संघटनेचे कार्य सुरू करण्यासंदर्भात चर्चेसाठी आपण येत्या २६ रोजी बेळगाव येथे बैठक घेणार असल्याचे म्हटले होते. या बैठकीत गोव्यात शाखा सुरू करण्याविषयी रुपरेषा ठरवणार असल्याचेही त्यांनी उघड केले होते. गेल्या २० ऑगस्ट २०१४ रोजी या संघटनेवर गोव्यात गुन्हेगारी दंडसंहितेच्या कलम १४४ (४) खाली बंदी घालण्यात आली आहेत. आपला हिंदुत्वाचा कार्यक्रम गोव्यात राबविणार असल्याचे मुतालीक यांनी जाहीर केल्यानंतर राज्यात या संघटने विरोधात नाराजी व्यक्त झाली होती.