
लोकोत्सव २०१५ चा समारोप
आदर्श युवा संघ आणि बलराम ग्राम विकास संस्थेने कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने आमोणे येथील आदर्श ग्रामात आयोजित केलेल्या लोकोत्सव २०१५ चा थाटात समारोप करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात गोव्याच्या विविध भागातून आलेल्या ५० हजार पेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला. या समारोप सोहळ्याला द. गोव्याचे खासदार ऍड्. नरेंद्र सावईकर, भाजपाचे गोवा राज्य अध्यक्ष विनय तेंडुलकर, कार्याध्यक्ष क्रीडामंत्री रमेश तवडकर, सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष सत्यविजय नाईक, सरपंच महेश नाईक, भूषण प्रभुगावकर, लक्ष्मण रायकर, उमेश वेळीप, मीना गावकर, आदर्श युवा संघाचे अध्यक्ष उमेश गावकर, सचिव विशांत गावकर, देवेंद्र तवडकर यांचा समावेश होता. समारंभाचे औचित्य साधून ज्येष्ठ लोक कलाकार भीवा वेळीप आणि खासदार ऍड्. नरेंद्र सावईकर यांचा यावेळी शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन देविदास कदम आणि सुदेश नाईक यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन अनंत अग्नी यांनी केले. फॅनी फर्नांडिस, सुनीती टेग्से, स्वाती नाईक, सेलजा गोन्साल्विस, पल्लवी पै, कल्पिता नाईक, केसर गावकर, लीना देसाई, गीता गावकर, प्रणाली नाईक यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले तर सुमित्रा कुतिन्हो यांनी बक्षिसाचे वाचन केले.गोव्याची संस्कृती सांभाळण्याचे काम ग्रामीण भागातील कलाकारांनी केलेले आहे. आदर्श युवक संस्कृती रक्षणाचे जे काम करीत आहे त्याचे कौतुक करतानाच त्याचा सांभाळ आणि जागृती करण्याची जबाबदारी संपूर्ण नागरिकांची असल्याचे मत खासदार ऍड्. नरेंद्र सावईकर यांनी व्यक्त केले. तर क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनी आपल्या भाषणात लोकोत्सव म्हणजे साधना असून आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा सल्ला देतानाच शिक्षण, कृषी, स्वाभीमान आणि पर्यटन विकास हे आपले ध्येय असल्याचे मत व्यक्त केले.
तीन दिवस चाललेल्या लोकोत्सवात ज्या विविध स्पर्धा झाल्या त्या स्पर्धात कला संस्कृती मंडळ मेरशी आणि श्रीस्थळ शासकीय विद्यालयाने अजिंक्यपद पटकावले आहे. या सर्व स्पर्धातील विजेत्यांना उमेश गावकर, विशांत गावकर, कृष्णा वेळीप, भूषण प्रभुगांवकर, आमदार सुभाष फळदेसाई, विनय तेंडुलकर, क्रीडा मंत्री रमेश तवडकर आणि खा. नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विशांत गावकर यांनी शेवटी आभार मानले.