मराठी राजभाषेसाठी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विधेयक आणावे

0
93
धारगळ येथील शेकोटी संमेलनाच्या समारोप सत्रात बोलताना आमदार विष्णू वाघ, डावीकडून सागर जावडेकर, ऍड. रमाकांत खलप व मंगेश काळे. (छाया : निवृत्ती शिरोडकर)

शेकोटी संमेलनात विष्णू वाघ यांची मागणी
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येणार्‍या विधानसभेत मराठीभाषेला राजभाषा करणारे विधेयक विधानसभेत आणावे, त्याला आपला पूर्ण पाठिंबा असेल, केवळ मराठीतून शपथ घेतली म्हणून मराठीला राजभाषेला दर्जा मिळणार नाही. तर विधानसभेत विधेयक आणावे. त्याचवेळी मराठी आमदारांची भूमिका स्पष्ट होईल, असे प्रतिपादन आमदार तथा कोकण मराठी परिषदच्या १०व्या शेकोटी संमेलनाचे अध्यक्ष विष्णू सुर्या वाघ यांनी धारगळ येथे समारोप सत्रात केले.
यावेळी कोकण मराठी परिषदचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप, कार्याध्यक्ष सागर जावडेकर, कार्यवाह मंगेश काळे आदी हजर होते.यावेळी संमेलनाध्यक्ष विष्णू वाघ यांनी पुढे सांगितले की उत्तर गोव्याचे पेडणे तालुका हे मस्तक असून या तालुक्यात बहुतांश मराठी प्रेमी आहेत आणि मांद्रे मतदारसंघात मोठ्या संख्येने मराठी प्रेमीचे प्रतिनिधीत्व मुख्यमंत्री श्री. पार्सेकर करीत असल्याने आता त्यांना मराठी राज्य भाषा करण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे असे ते म्हणाले. सार्वजनिक शासकीय कार्यालयात मराठीचा वापर कमी होवू लागला आहे. प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी झाले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात अनिष्ठ प्रकारांचा सामना करावा लागणार असल्याचे वाघ म्हणाले.
न्यायालयात, मामलेदार, उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात मराठीतून व्यवहार झाला पाहिजे. त्यासाठी आग्रह धरण्याचे आवाहन वाघ यांनी केले.
महत्वाचे ठराव मंजूर
ज्या ८ मंत्र्यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली, त्यांचे अभिनंदन करणारा, मराठीला राज्यभाषा करण्याची मागणी करणारा, शासकीय कचेरीत मराठीतून व्यवहार करावे, असे महत्वपूर्ण तीन ठराव संमत करण्यात आले.
कोकण मराठी परिषदेचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी शासकीय व्यवहारात मराठीला कोकणी एवढाच सन्मान मिळून द्या अशी मागणी केली. यापुढे कोकण मराठी परिषद युवक व महिलांसाठी खास विभाग स्थापन करून सर्वांना समान व्यासपीठ देण्याची ग्वाही देऊ. नवीन अध्यक्ष म्हणून सागर जावडेकर यांच्या नावाची घोषणा केली. आपण सल्लागार समितीचा अध्यक्ष राहण्याचे जाहीर केले. शेवटी सागर जावडेकर यांनी आभार मानले.