मडगावातील बैठकीत उमटली तीव्र नाराजी : उद्या वीज मंत्र्यांना भेटणार
वीज खात्यातील कनिष्ठ अभियंत्यांना दोन वर्षांमागे अस्थायी बढत्या, पाच महिन्यांमध्ये ज्येष्ठता यादीला मूठमाती देऊन चौघांना कार्यकारी अभियंतापदी बढती व निवृत्ती नंतरही कंत्राटी पध्दतीवर कामावर घेणे अशा प्रकारांमुळे या खात्यातील अभियंत्यांमध्ये असंतोष पसरला असून गोव्यातील वीज खात्यातील अभियंत्यांची बैठक मडगावात शनिवारी झाली व त्यात अभियंत्यांच्या न्याय मागण्या मान्य न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. मंगळवार दि. १३ रोजी एक शिष्टमंडळ मागण्यासाठी वीजमंत्री मिलिंद नाईक यांना भेटण्याचा निर्णय घेतला.शनिवारी वीज खात्याचे अभियंता दीपक कृष्णा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक भरली. त्यात राज्यातील वीज खात्याचे अभियंते उपस्थित होते. या बैठकीत अभियंत्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचे वर्णन केले व १८ सप्टेंबर २०१२ रोजी गोव्यातील १०१ कनिष्ठ अभियंत्यांना अस्थायी बढती दिली. पण दोन वर्षे झाली तरी कायम करण्यात आले नाही. निवृत्तीनंतर कंत्राट पध्दतीवर कामावर ठेवण्यास विरोध असताना यावर्षी तिघाना कामावर पुन्हा घेतले आहे. त्यामुळे त्यामागील अभियंत्यांना बढत्यापासून वंचित राहावे लागते.
दि. २४ जुलै २०१४ रोजी सरकारने ज्येष्ठता यादीला मूठमाती देऊन भलत्यांना कार्यकारी अभियंतापदी बढत दिली आहे. बढती यादीत २४ जण असताना या ज्येष्ठता यादीतील क्रमांक ८, १०, १६ व २० व्या क्रमांकावर असलेल्यांना बढत्या दिल्या. काही मंत्र्याच्या मर्जीतील अभियंत्यांना ज्येष्ठता यादी डावलून बढत्या दिल्याने ३२ ते ३३ वर्षे सेवा केलेल्यांवर बढत्याविना अन्याय झाला आहे. कार्यकारी अभियंत्यांच्या सात जागा रिकाम्या आहेत. पण भरण्यात आले नाहीत. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. या अस्थायी बढत्या व हल्लीच दिलेल्या चौघाच्या बढत्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली असून त्याचा परिणाम वीज खात्यातील प्रशासनावर पडला आहे. या बैठकीत दीपक नाईक यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली. त्यात संदीप प्रभुदेसाई, मारियो फुर्तादो, संदीप देसाई, अरुण पाटील, वल्लभ सामंत, राजू इरनल व शैलेंद्रकुमार साळवी यांचा समावेश आहे. मंगळवारी ही समिती वीजमंत्र्यांना भेटून आपणावर झालेल्या अन्यायाची माहिती देणार आहेत.