जयश्री रॉय यांचे प्रतिपादन
स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांकडून झालेल्या लिखाणामुळे स्त्रीबद्दलची समाजाची भूमिका बदललेली दिसून येते. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या पदार्पणामुळे स्त्रीचे सामाजिक चित्रही वेगळे बनलेलेले आहे, असे प्रतिपादन हिन्दीमधील प्रसिध्द साहित्यिक जयश्री रॉय हरमलकर यांनी येथे केले.
साहित्य अकादमी, नवी दिल्लीने इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सहयोगाने ब्रागांझाच्या परिषदगृहात रविवारी आयोजित केलेल्या ‘पश्चिम भारतीय भाषांमध्ये महिलांचे साहित्य’ चर्चा सत्रात सौ. जयश्री प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होत्या. अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीच्या कोकणी सल्लागार मंडळाचे डॉ. तानाजी हळर्णकर होते. यावेळी व्यासपीठावर ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष संजय हरमलकर व साहित्य अकादीमचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने उपस्थित होते. प्राचीन काळात रामायण, महाभारत ग्रंथामध्ये देखील स्त्रीविषयक लिखाण दिसून येते. १९२९ पासून देशात महिला सहित्य क्षेत्रात येवू लागल्या मात्र प्रत्यक्षात १९४९ नंतर महिलांचे साहित्य क्षेत्रात लिखाणाचे प्रमाण वाढले असे स्पष्ट करून सौ. जयश्री यांनी सांगितले की स्त्री ही केवळ कोणाची तरी आई किंवा पत्नी नसते. ती देखील एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचे अस्तित्व आहे व हे अस्तित्व ती सिध्द करू पहात आहे. सध्या स्त्रिया केवळ घर सांभाळणे, मुलांचा सांभाळ करणे एवढे काम करत नाहीत तर पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत.
स्त्रिया स्वावलंबी असल्या तरी त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत. डॉ. तानाजी हळर्णकर म्हणाले, साहित्य क्षेत्रात महिला लेखिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोकणीत तर हे प्रमाण पुरषांएवढेच समान आहे. भारतीय साहित्यात महिलांचे योगदानही महत्वपूर्ण आहे व त्यांनी स्वत:चे स्थान या क्षेत्रात निर्माण केले आहे.
चर्चासत्राच्या उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात डॉ. किरण बुडकुले यांच्या अध्यक्षतेखाली ‘महिलांच्या साहित्यातील महिला’ या विषयावरील सत्रात इंदू जोशी (गुजराती), डॉ. सोनिया शिरसाट (कोकणी), अनुपमा उजगरे (मराठी), मीना रुपचंदाणी (सिंधी) यांनी निबंध वाचन केले. भोजनोत्तर सत्रात ऍड्. उदय भेंब्रे यांच्या अध्यक्षतेखाली ‘महिलांच्या साहित्यातील समाज’ या विषयावर पारुल देसाई (गुजराती), डॉ. प्रियदर्शनी तडकोडकर (कोकणी), शोभा नाईक (मराठी) व माया राही (सिंधी) यांनी निबंध वाचन केले. पुंडलिक नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेवटच्या सत्रात उषा उपाध्याय (गुजराती), डॉ. हरिश्चंद्र नागवेकर (कोकणी), डॉ. अरुणा ढेरे (मराठी) व विम्मी सदारंगाणी (सिंधी) यांनी सादर केले.