वाहतुकीचा बोजवारा कायम; परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही
जीवाचा गोवा करण्यासह नववर्ष साजरे करण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांचा महापूरच राज्यात आला असून राज्यातील सर्व शहरे व किनारपट्टीवरील रस्त्यांवरून हजारो वाहने अहोरात्र वाहू लागल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार कालच्या दिवशीही सुरूच राहिले. आज ‘थर्टी फर्स्ट’च्या दिवशीही या दृश्यात फरक पडण्याची शक्यता नाही. या सर्व प्रकारांमुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या हालाना पारावार राहिला नाही.आज ३१ डिसेंबर हा या वर्षातील शेवटचा दिवस असून आजही राज्यात प्रचंड गर्दी राष्ट्रीय महामार्ग व अंतर्गत मार्गावरही दिसून येणार आहे. प्रमुख शहरांकडे तसेच दक्षिण व उत्तर गोव्याच्या किनारपट्टीकडे जोडणार्या रस्त्यांवर कालही प्रचंड होती. यामुळे दिवसभरात पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण पडला. काही ठिकाणी पोलीस तैनात करण्यात न आलेल्या जागी प्रवासी वर्गाचे अतोनात हाल झाले.
राज्यात ठिकठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांनी नववर्षाच्या आनंद द्विगुणीत करण्यासाठी किनारपट्टी जवळील तारांकित, पंचतारांकित व अन्य हॉटेल्समध्ये आगावू आरक्षण केले आहे. राज्यातील शहरी भागातही सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल असल्याने पर्यटकांनी मोकळ्या जागी बस्तान मांडल्याचे चित्र दिसून येते. जुने गोवे येथील चर्च परिसरातही हे दृश्य पहायला मिळाले.
कुठ्ठाळी जंक्शनवर कोंडी
राष्ट्रीय मार्ग क्र. १७ वरून पणजीकडे ये-जा करणार्या प्रवासी वर्गाबरोबर पर्यटकांनाही वाहतूक कोंडीचा त्रास सोसावा लागला. कुठ्ठाळी जंक्शनवर वाहतूक पोलीस यंत्रणा कार्यरत होती. टप्प्याटप्प्याने मडगाव व वास्को राष्ट्रीय मार्गावरील वाहने सोडताना पोलीस यंत्रणेलाही बराच त्रास झाला. वाहतुकीचे नियम तोडू पाहणार्या प्रवासीवर्गाला पोलिसांकडून तंबीही देण्यात आली. जुवारी पुलावर कमी पोलीस ठेवण्यात आल्याने वाहतुकीवर याचा काल मोठा परिणाम झाला. यामुळे प्रवासीवर्गाने पोलीस आणि सरकारच्या नावाने बोटे मोडायला सुरुवात केली.
पणजी-जुने गोवे बायपासवर पोलीस नियंत्रण नाही
पणजी ते जुने गोवे बगल मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून येथील कच्च्या रस्त्यावर जीव मुठीत धरून वाहन चालकांनी प्रवास केला. येथे नियंत्रण ठेवण्यासाठी एकही पोलीस तैनात करण्यात आला नव्हता. पणजीकडे ये-जा करणार्या या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासीवर्ग वाहतूक करतात. नववर्षाच्या पूर्वसंध्येला येथील मातीच्या कच्च्या रस्त्यावरून खास करून रात्रीच्यावेळी प्रवास करणार्या येथे धोका संभवतो असाही नाराजीचा सूर काही वाहनचालकांनी बोलून दाखविला.
काल दिवसभरात झालेली राज्यातील ठिकठिकाणची वाहतुकीची कोंडी, वाहतुकीची कोलमडलेली पार्किंग व्यवस्था आदी गोष्टींना उद्या नववर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांना सामोरे जावे लागणार आहे. काल दिवसभरात राज्यातील प्रसिध्द समुद्र किनार्यावर, प्रसिध्द मंदिरात, जुने गोवे गोंयच्या सायबाच्या दर्शनासाठी उसळलेली गर्दी प्रचंड होते. यासाठी उद्या पणजी-मडगाव, पणजी-म्हापसा व वास्को, पणजी-फोंडा व दक्षिण व उत्तर गोवा समुद्र किनार्याकडे जोडणार्या रस्त्यावर प्रचंड ताण पडणार आहे. सर्वत्र पार्ट्यांची धूम ही पूर्वसंध्येलाच सुरू होणार आहे. वाहतूक व्यवस्था हाताळण्यासाठी उद्या पुरेसा पोलीसवर्ग ठिकठिकाणी तैनात करणे आवश्यक असल्याचे बोलले जाते. पार्किंग व्यवस्थेसंदर्भातही वेळीच पावले उचलल्यास उद्या ती डोकेदुखी ठरणार नाही.
आज सिनेजगतातील अभिनेते, कलाकार, उद्योजक, महनीय व्यक्ती नववर्षाच्या स्वागतास दाखल झाल्याचे वृत्त आहे. उद्या दिवसभरात व नववर्षाच्या पूर्वसंध्येला देश-विदेशातील पर्यटकांचे स्वागत करण्यास गोवा सज्ज झाल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात येत आहे.