एअर एशियाचे इंडोनेशिया – सिंगापूर विमान
सूरबाया (इंडोनेशिया) येथून रविवारी सकाळी सिंगापूर येथे निघालेले एअर एशिया कंपनीचे विमान बेपत्ता झाले असून त्यावरील कर्मचार्यांसह १६२ लोक ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मलेशियन विमान दुर्घटनाग्रस्त होण्याची ही या वर्षातील तिसरी घटना आहे.स्थानिक वेळेनुसार सकाळी ५.२० वा. एअर एशिया क्यूझेड ८५०१ या विमानाने सूरबाया येथून सिंगापूरला जाण्यासाठी उड्डाण केले होते. नंतर थोड्याच वेळात या विमानाच्या वैमानीकाने खराब हवामानामुळे मार्ग बदलासाठी यंत्रणेकडे विनंती केली होती. मात्र थोड्याच वेळात त्यांचा वाहतूक नियंत्रण कक्षाकडील संपर्क तुटला. दुर्घटनाग्रस्त विमानात सात कर्मचार्यांव्यतिरिक्त १५५ प्रवासी होते. त्यात एक ब्रिटिश, एक मलेशियन, तीन कोरियन नागरिक होते. त्यापैकी एक अर्भक व १६ मुले असल्याचे सांगण्यात आले. विमान बेपत्ता होऊन अनेक तास उलटले असून एवढ्या वेळात त्यातील इंधन संपणार असल्याची माहिती इंडोनेशियन अधिकार्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, हे विमान सुमात्राच्या पूर्व किनारपट्टीतील समुद्रात कोसळले असल्याचे अनधिकृत वृत्त आहे. मात्र दुर्घटनेचे नेमके ठिकाण या वृत्तात नमूद केलेले नाही. विमान वाहतूक नियंत्रण कक्षाकडील वरील विमानाचा संपर्क इंडोनेशियन प्रदेशातच तुटला असे सिंगापूरच्या विमान वाहतूक अधिकार्यांनी म्हटले आहे.
उड्डाण झाल्यानंतर ४२ मिनिटांनी संपर्क तुटल्याचेही या अधिकार्यांनी सांगितले. या विमानात कोणीही भारतीय नसल्याचेही सांगण्यात आले. सिंगापूरच्या चांगी विमानतळावर हे विमान ८.३० वा. उतरणार होते. या विमानाच्या वैमानिकाकडे विमान चालविण्याचा ६१०० तासांचा अनुभव असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, इंडोनेशियन अधिकार्यांनी विमान शोध कार्यासाठी मोहीम सुरू केली आहे. विमान समुद्रात कोसळण्याची शक्यता गृहीत धरून संबंधित विभागांमध्ये पाच जहाजे पाठविण्यात आली असून हवाई दलाच्या १५ जवानांसह टेहळणी विमानेही पाठविण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. या अनुषंगाने सिंगापूरमधील प्रशासनही संबंधितांशी संपर्क साधून आहेत. शोधकार्यासाठी भारताचे सहकार्य
दरम्यान, भारतीय नौदलाने बेपत्ता विमानाच्या शोध व मदतकार्यासाठी तीन जहाजे व एक टेहळणी विमान सज्ज ठेवले असल्याचे भारतीय नौदलाच्या सूत्रांनी सांगितले. यापैकी एक जहाज बंगालच्या उपसागरात व दोन अंदमान समुद्रावर सज्ज ठेवण्यात आली आहेत. पी- बीआय हे पाणबुड्यांविरोधात युध्दावेळी वापरण्यात येणारे विमानही तयार ठेवण्यात आले आहे. आदेश मिळताक्षणी जहाजे व विमान तातडीने सेवेत दाखल केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.