पेशावर हल्ल्यानंतर गृह खाते खडबडून जागे
पाकिस्तानातील पेशावर येथील तालिबानी आतंकवाद्यांच्या हल्ल्याच्या धसका घेऊन तत्परतेचा उपाय म्हणून काल पणजी व ताळगाव भागातील शाळा, विद्यालय व्यवस्थापनांची पोलीस अधिकार्यांनी संयुक्त बैठक घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने बंदुकधारी सुरक्षा शिपाई ठेवण्याची व्यवस्था करण्यास सांगितले.गृह मंत्रालयाने राज्य व केंद्र शासित प्रदेशांना प्रमुख शहरांतील शाळांमध्ये असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गृह खाते दक्ष झाले असून पणजी, मडगाव, वास्को आदी महत्त्वाच्या शहरांतील शाळांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्याबाबत तत्परतेने पावले उचलली जात आहेत.
काल पणजी पोलीसांनी घेतलेल्या बैठकीत पणजी व ताळगाव परीसरांतील काही शाळा व्यवस्थापनांच्या प्रतिनिधींनी आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बंदुकधारी शिपाई नियुक्त करणे कठीण जाणार असल्याची अडचण मार्गदर्शन करणार्या पोलीस अधिकार्यांसमोर मांडली. त्यावर शिक्षण खात्याच्या मदतीने हा प्रश्न सोडविण्याचे पोलिसांनी ठरविले आहे.
काल बोलावलेल्या बैठकीला २२ विद्यालयांच्या व्यवस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिक्षण खात्याने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा सल्ला व्यवस्थापन मंडळांना दिल्याचे पोलीस निरीक्षक प्रभूदेसाई यांनी सांगितले. पेशावर येथे अतिरेक्यांनी विद्यार्थ्यांची निघृण हत्त्या केल्यानंतर जग हादरले आहे. भारतानेही शाळांच्या सुरक्षेचा विषय गंभीरपणे घेतला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यास तत्ुपरतेने सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही सर्व शाळांना सुरक्षेसंबंधिची माहिती देण्यास प्रारंभ केला आहे.
या व्यवस्थेचा नियमितपणे आढावा घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकारी प्रभूदेसाई यांनी सांगितले. राज्यातील बहुतेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरम्यान, गोव्यातील प्रमुख शहरांतील कोणत्याही शाळांमध्ये अजूनपर्यंत बंदुकधारी शिपाई बंदोबस्तासाठी ठेवले जात नव्हते. वरील सूचनेमुळे व्यवस्थापनांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. सशस्त्र शिपाई नियुक्त करण्यासाठी शिक्षण खात्याने भरती करण्याची मागणी होत आहे.