साखळीत मान्यवरांच्या उपस्थितीत रवींद्र महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन
केंद्रातील संरक्षण मंत्रीपद आव्हानात्मक जबाबदारी असून देशात व सीमेपलीकडून सध्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. मात्र, या संकटांचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी देशाची यंत्रणा सज्ज असून वर्षभरात फार मोठे बदल व सुधारणा झाल्याचा अनुभव देशवासीयांना अनुभवता येईल असे आश्वासक उद्गार संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी साखळी रवींद्र भवनात आयोजित दोन दिवसीय रवींद्र महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना काढले.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ४५ दिवसांच्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपदाला पूर्ण न्याय देताना लोकहिताचे निर्णय घेतले. बुद्धीमत्तेच्या जोरावर गोव्याचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळण्यात ते यशस्वी होणार असल्याचे गौरवोद्गार पर्रीकर यांनी यावेळी काढले.
संरक्षणमंत्र्यांचा सत्कार
यावेळी साखळी नागरिक व रवींद्र भवनच्या वतीने संरक्षणमंत्री पर्रीकरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व दीपस्तंभ देऊन सत्कार करण्यात आला. गोव्याचे सांस्कृतिक वैभव विविध लोककला व संस्कृतीच्या माध्यमातून चिरंतन टिकून आहे. ‘सन बर्न’ ही गोव्याची संस्कृती नसून पिढ्यानपिढ्यांपासून आमच्या मातीत रुजलेल्या संस्कृतीचा ठेवा चिरंतन टिकवून ठेवण्यासाठी गोव्याची खरी ओळख जगासमोर आणण्यासाठी रवींद्र महोत्सवासारखे उत्सव महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मयेला लवकरच मुक्ती
मये गावाला पूर्ण मुक्ती देण्याचे काम सरकारने युद्धपातळीवर हाती घेतलेले असून लवकरच त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन ऐतिहासिक कामगिरी पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. साखळी रवींद्र भवन डिचोली व सत्तरीतील कलाकार व जनतेसाठी वरदान ठरणारे असून वर्षभरात विविधांगी कार्यक्रमांद्वारे सांस्कृतिक संचित जपण्याचे काम साध्य करण्यात डॉ. प्रमोद सावंत यशस्वी ठरल्याचे पार्सेकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी हाकली बैलगाडी
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे उद्घाटन स्थळी आले असता त्यांना बैलगाडीतून आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांनी ही विनंती मान्य करताना हातात दोरी देऊन बैलगाडी हाकण्याची संधी देत असाल तरच बसेन अशी अट आमदार डॉ. प्रमोद सावंत यांना घातली. त्यांनी ती मान्य करताच मुख्यमंत्र्यांनी बैलगाडीची सूत्रे सांभाळली आणि थेट बैलगाडीवरून प्रवेशद्वारापर्यंत पोचते झाले. या अनुभवाने आपल्याला खूप समाधान झाल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
उपसभापती अनंत शेट यांनी या महोत्सवातून गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडल्याचे सांगून जुन्या पिढीचा हा वारसा नव्या पिढीने जपण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिल्याचा उल्लेख केला. निसर्ग रक्षणाबरोबरच सांस्कृतिक वैभव जपण्याचे काम या उत्सवाच्या माध्यमातून साध्य होणार असल्याचे ते म्हणाले.
मान्यवरांचा सत्कार
ज्येष्ठ चित्रकार शिवानंद खेडेकर, सेवाभावी डॉ. गुरुप्रसाद कापडी व शिक्षक गजानन कर्पे यांचा मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व फुलाची कुंडी देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तीच्या वतीने डॉ. कापडी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रवेशद्वारावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपसभापती अनंत शेट, डॉ. प्रमोद सावंत यांनी नारळ वाढवून व माले प्रज्वलित करून महोत्सवाचे दिमाखात उद्घाट केले. यावेळी पारंपरिक गणपती नमन सादर करण्यात आले.
डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत केले. रवींद्र काणेकर, उमेश सरनाईक, उपेंद्र कर्पे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दोन दिवसीय महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.