पाकिस्तानमधील पेशावरच्या शाळेवरील दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार असलेला तालिबानी कमांडर पाकिस्तानी लष्कराने खैबर प्रांतात केलेल्या धडक कारवाईत मारला गेला. त्याच्या एका साथीदाराला पकडण्यात आले आहे. तेहरीक ई तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेच्या तारीक गदर गटाचा सदस्य असलेल्या सद्दाम याने पेशावर हल्ल्यातील सहा हल्लेखोरांना सहाय्य केले होते. गेल्या सोळा डिसेंबरला झालेल्या या हल्ल्यात १६० मुले व शिक्षक मारले गेले होते. पाकिस्तानी लष्कराने तेहरिक ई तालिबानविरुद्धची कारवाई थांबवली नाही तर आणखी आत्मघाती हल्ले चढवण्याची धमकी त्या संघटनेने दिली होती. मात्र, पाकिस्तानी लष्कराने आपली कारवाई सुरूच ठेवली आहे.
तेहरिक ई तालिबानचा नेता उमर मन्सूर ऊर्फ खलिफा उमर आणि हल्लेखोर यांच्यातील संभाषण पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागले होते. त्यामुळे या हल्ल्यामागे उमर मन्सूर आणि त्याची संघटना असल्याचे स्पष्ट झाले होते.