बडतर्फ मनपा कामगारांचे आंदोलन
गेल्या आठ दिवसांपासून चालू असलेले पणजी महापालिकेच्या कामगारांचे आंदोलन सांताक्रुझचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे मिटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सोमवारी त्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत महापालिका आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांच्या हेकेखोरपणामुळे तेडगा निघू शकला नसल्याचा आरोप कामगार नेते अजितसिंह राणे व स्वाती केरकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच या पार्श्वभूमीवर संजीत रॉड्रिग्ज यांची तात्काळ आयुक्तपदावरून हकालपट्टी करण्यात यावी व त्या जागी संजीव गडकर अथवा एल्विस गोम्स यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी करून संजीत रॉड्रिग्ज आयुक्तपदी असेपर्यंत तोडगा निघणार नसल्याचे सांगितले. तसेच येत्या एक-दोन दिवसात जेलभरो आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.आयुक्तांमुळे बोलणी फसली
हा संप मिटावा व संपावर असलेल्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी तोडगा काढण्यासाठी सोमवारी संध्याकाळी महापालिका व कामगारांचे नेते यांची संयुक्त बैठक घडवून आणली होती. यावेळी बोलणी फलदायी होत असतानाच संपावरील कामगारांना संपाच्या दिवसांचे वेतन देण्याच्या प्रश्नावरून चिडून संजीत रॉड्रिग्ज हे बैठक अर्ध्यावरच सोडून निघून गेले. महापौर सुरेंद्र फुर्तादो व सर्व नगरसेवकही ही बोलणी फलदायी व्हावी यासाठी प्रयत्नरत असताना संजीत रॉड्रिग्ज हे ही बैठक अर्ध्यावर सोडून गेल्यामुळे समेटाचे प्रयत्न फसल्याचा आरोप अजितसिंह राणे व स्वाती केरकर यांनी केला. कामगारांची सहनशीलता आता संपली असून येत्या दोन-तीन दिवसांत जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे कामगार नेत्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांची हकालपट्टी होऊन नवे आयुक्त आले तरच आता कामगारांच्यावतीने आम्ही चर्चेसाठी येऊ, असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. संजीत रॉड्रिग्ज यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी अशी मागणी असल्याचे यावेळी स्वाती केरकर यांनी सांगितले.
संपावर असलेल्या कामगारांपेक्षा जास्त पैसे देऊन कचरा उचलण्यासाठी महापालिकेने कामगार आणले आहेत. मात्र, शहरातील कचरा उचलणे त्यांना जमत नसून त्यामुळे शहरात कचर्याचे ढिग पसरून राहिले असल्याचे राणे म्हणाले.
अंत्यसंस्कारांवर परिणाम नाही
संजीत रॉड्रिग्ज हे संपावरील कामगारांवर नको असलेले खोटे आरोप करू लागले आहेत. या संपामुळे पणजीतील हिंदू व ख्रिस्ती स्मशानभूमीत होणार्या अंत्यसंस्कारांवर परिणाम होऊ लागला असल्याचा त्यानी केलेला आरोप खोटा आहे. महापालिकेचे कामगार संपावर असले तरी स्मशानभूमीत काम करणारे कामगार तेथे काम करीत आहेत. हिंदू स्मशानभूमीत बालप्पा खोलकर व भीमप्पा हरिजन हे कामगार काम करीत आहेत. तसेच ख्रिश्चन स्मशानभूमीतीलही दोघे कामगार काम करीत आहेत.
अंत्यसंस्कारांचे काम अडू नये यासाठी त्यांना संपात सहभागी न होण्याची सूचना करण्यात आली असल्याचे राणे यांनी सांगितले. आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांना सरकारचा छुपा पाठिंबा आहे आणि म्हणूनच ते एवढे बेजबाबदार व हेकेखोरपणे वागत असल्याचा आरोपही राणे व केरकर यांनी यावेळी केला.
संपकाळातील वेतन देण्यास विरोध : महापौर
संपावर असलेल्या महापालिकेच्या कामगारांना संपाच्या काळातील वेतन देण्यास आपलाही विरोध असल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल सांगितले. महापालिकेचे कामगार संपावर असल्याने आम्ही सध्या कंत्राटदारांकडून कामगार आणले आहेत. त्यांना पगार द्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत संपकाळातील पगार दिला जावा ही संप मागे घेण्यासाठीची संपावरील कामगारांची पूर्वअट मान्य करता येण्याजोगी नसल्याचे फुर्तादो म्हणाले. केवळ संजीत रॉड्रिग्ज यांच्यामुळे बोलणी यशस्वी होऊ शकली नाही हे म्हणणे तेवढेसे खरे नसल्याचे ते म्हणाले.