भारतीय सैन्याला अत्यावश्यक शस्त्रांचा तुटवडा

0
67

भारतीय सैन्याला शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून शरीर गोठवणार्‍या सियाचिन व लेह येथील सैनिक तळांवर पहारा ठेवणार्‍या सैनिकांना बूट तसेच मच्छरदाण्यांची कमतरता भासत आहे. तसेच गेल्या दशकापासून अत्यावश्यक रायफलांचा पुरवठा करण्यात आलेला नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष संसदेच्या संरक्षणविषयक अस्थायी समितीने काढला आहे. संरक्षण मंत्रालयाने पुरविलेल्या माहितीच्या आधारे अस्थायी समितीचे अध्यक्ष भाजपचे मेजर बी. सी. खंडुरी व ३३ सदस्यीय समितीने हा अहवाल सादर केला आहे. समितीने संसदेला सादर केलेल्या अहवालात उंच शिखरांवर सेवा बजावणारे सैनिक पाय सुरक्षित ठेवणारे सुमारे २ लाख बूट, १३ लाख कॅनव्हास बूट, १ लक्ष मच्छरदाण्या तसेच तोंड गरम राहण्यासाठी ६५,००० मास्कच्या प्रतीक्षेत असल्याचे म्हटले आहे.
बुटेलप्रूफ जॅकेटविषयी संरक्षण मंत्रालयाने माहितीच पुरविली नसल्याने समितीने आश्‍चर्य व्यक्त केले आहे. जवानांना युद्धावेळी जीव वाचविण्यात महत्त्वाचे असलेले हे साधन संरक्षण मंत्रालयाने खरेदीच केले नसल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा प्रकार हजारो जवानांच्या जीवाशी खेळण्याचा असल्याचे ताशेरे अहवालात ओढण्यात आले आहे.
समितीने या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली असून संरक्षण मंत्रालय सैन्यदल प्रमुखांना शस्त्रसाठ्याचे नियोजन करतेवेळी विश्‍वासात घेत नसल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) सैन्यदलासाठी अत्यंत आवश्यक असलेले आयएसएसएएस रायफलचे तंत्रज्ञान विकसित करण्यात १९८२ पासून साफ अपयशी ठरल्याचेही समितीने अहवालात म्हटले आहे.