जानेवारीपासून दर दिवशी मुंबई-गोवा पर्यटन रेलगाडी 

0
114

राज्यात येणार्‍या पर्यटकांच्या सोयीसाठी येत्या दि. ३० डिसेंबरपासून मुंबई-गोवा मार्गावर विशेष रेलगाडी सुरू होईल तर जानेवारीपासून दर दिवशी ती उपलब्ध होईल, अशी माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पर्यटन व्यवसायाला ही रेलगाडी वरदान ठरेल, असे ते म्हणाले.

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकारामुळेच हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. या विशेष रेल्वेतून गोव्यात येणार्‍या पर्यटकांची रेल्वे स्थानकावरून त्यांच्या हॉटेलपर्यंत नेण्याची व तेथून पुन्हा स्टेशनवर आणण्यासंबंधीची पॅकेज देण्याचाही विचार आहे. संबंधित अधिकार्‍यांच्या काल झालेल्या बैठकीत त्यावर विचार झाल्याचे श्री. परुळेकर यांनी सांगितले. पर्यटन स्थळांवरील सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा पर्यटन भवनमध्ये उभारण्यात येणार असून त्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च येणार असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. त्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागात मिळून सुमारे २५० कॅमेरा बसविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. समुद्र किनार्‍यावर आनंद लुटणारे पर्यटक पाण्यात बुडाल्यास त्यांना वाचविण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून ‘होन्डरक्राप्ट’ उपलब्ध करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना यासंबंधी मागणीचे निवेदन सादर करणार असल्याची माहिती पर्यटनमंत्र्यांनी दिली.