मागास जमाती दर्जासाठी प्रयत्न
आगामी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेऊन सरकारने सध्या विकासकामांचा धडाका लावला असून काल समाजकल्याण खात्याने घाईगडबडीत केलेल्या कार्यक्रमात धनगर समाजाला जलदगतीने विविध योजनांचा लाभ मिळवून देणे शक्य व्हावे म्हणून खास गवळी विभाग स्थापन केला. समाजकल्याण मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते या विभागाचे उद्घाटन झाले.
या समाजाला अद्याप मागास जमाती दर्जा मिळू शकलेला नाही. त्यामुळे काही सुविधांच्या बाबतीत त्यांच्यावर अन्याय होऊ नये व त्यांना सरकाच्या योजनांचा पूर्णपणे लाभ मिळावा यासाठीच हा विभाग स्थापन करण्यात आला. मागास जमाती दर्जासाठी पुढील महिन्यात शिष्टमंडळ दिल्लीला नेणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. या विभागातील योजनांसाठी सरकारने दीड कोटी रुपयांची तरतूद केली असून मार्च अखेरपर्यंत सर्व विधी खर्च केला जाईल, असे त्यांनी सांगितले. समाजकल्याण खात्याने सोलर काटन, सोलर कुकर, या समाजातील आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सायकलीचे वितरण, घरगुती गॅसच्या जोडण्या, दहावीनंतर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावावर २५ हजार रुपये कायम ठेव या योजना या विभागाकडे सोपविण्यात आल्याची माहिती संचालक एन. डी. नार्वेकर यांनी दिली. उद्घाटन सोहळ्यास जिल्हा पंचायत सदस्या, रश्मी लांबोर, लक्ष्मण कवळेकर, गंगाराम मोरजकर उपस्थित होते. उपसंचालक सांतान फर्नांडिस यांनी आभार मानले.