दिग्विजयसिंह यांच्या उपस्थितीत चिंतन शिबिर
अ. भा. कॉंग्रेसचे महासचिव तथा गोव्याचे प्रभारी दिग्विजयसिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रदेश कॉंग्रेसच्या दोन दिवसांच्या चिंतन शिबिरात भाजप सरकारवर १५ कलमी आरोपपत्र ठेवण्यात आल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रिमंडळ पातळीवरील व प्रशासनातील भ्रष्टाचार शिगेला पोचला आहे, नोकर्यांसाठी राजरोस पैसे घेतले जातात, सार्वजनिक बांधकाम, नगर नियोजन वाहतूक, पोलीस या सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला आहे, लाच घेऊन गोवा पायाभूत सुविधा विकास मंडळाची कंत्राटे दिली जातात, असे आरोप सरकारवर ठेवण्यात आले आहेत.राज्याच्या मुक्तीनंतर प्रथमच राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यातून राज्याला वर काढणे कठीण होईल. निधी अभावी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे कामही बंद ठेवण्याची सरकारवर पाळी आली आहे. राज्यात भयभीत वातावरण तयार झाले असुन सरकारच्या योजनाही ठराविक लोकांसाठीच तयार केल्या जातात. सरकारी नोकर्यांच्या संधी भाजपच्याच कार्यकर्त्यांना मिळत असल्याचा आरोप फालेरो यांनी केला. अत्यंत नियोजन करून ९० टक्के नोकर्या भाजप कार्यकर्त्यांनाच देण्याची व्यवस्था केल्याचा आरोप सरकारवर ठेवला आहे.
राज्यात सध्या अमली पदार्थांचा गैरव्यवहार, वेश्याव्यवसाय, कॅसिनो व इडीएम उत्सवांना ऊत आला असून त्याचा पर्यटनावर वाईट परिणाम होत असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी स्वभावामुळे राज्यातील खाण व्यवसायाची स्थिती बिकट बनली. खाणींवर प्रत्यक्ष अवलंबून असलेल्या ८० हजार कामगारांवर आलेली उपासमारीची पाळी राज्याच्या भवितव्याचा विचार न करता जनतेला लाचार करण्यासाठी सवलती देण्याचे धोरण, मंत्र्यांचे विदेशी दौरे, तसेच समाजात फुट पाडण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. भाजप सरकार पूर्णपणे उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या हातात असल्याचा आरोपही कॉंग्रेसतर्फे या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
तळागाळात जाऊन पक्ष बळकट करण्यासाठी पक्षाने कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फालेरो यांनी दिली.
पक्षाची कामगिरी जनतेपर्यंत न पोचल्याने पराभव : दिग्विजय
कॉंग्रेसची वाहिनी वा मुखपत्र येणार
आपल्या पक्षाने केलेल्या कामाची पक्षाला सकारात्मक पध्दतीने जनतेला माहिती देणे शक्य झाले नाही. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. हा धडा घेऊन नव्या माध्यमांचा उपयोग करून पक्ष वर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोव्याचे प्रभारी दिग्विजयसिंह यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
देशातील प्रसारमाध्यमे पूर्णपणे व्यापारी बनली आहेत. या माध्यमांच्या मालकांचे राजकारण्यांशी साटेलोटे आहेत. त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यासाठी आता पक्षाने माध्यम विभाग स्थापन करण्याचा व पक्षाची माहिती सर्व स्तरांपर्यंत पोचविण्यासाठी वाहिनी वा मुखपत्र सुरू करण्याचाही प्रस्ताव असल्याचे सिंह यांनी सांगितले.
काल झालेल्या चिंतन शिबिरात, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी उद्योग उभारणे, पर्यटन व्यवसायावर फेरविचार करून त्याचे पूर्णपणे नूतनीकरण करणे, स्थानिकांना रोजगार मिळेल अशा पध्दतीत गुंतवणूक करणे, सेवा क्षेत्राचा विकास करण्यावर भर देणे अशा अनेक गोष्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती सिंह यांनी दिली.
कूळ कायद्यात सरकारने केलेल्या दुरुस्तीच्या प्रश्नावर काल चिंतन बैठकीत चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार ऍड. रमाकांत खलप व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी हा विषय उचलून धरल्याचे कळते.