‘पणजीतून जिंकणे कठीण नाही’
पणजी मतदारसंघातून विजयी होणे हे माझ्यासाठी कठीण काम नाही. पणजी महापालिकेने सदैव माझ्याबाजूने कौल दिलेला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत माझ्या पॅनेलचे १६ नगरसेवक विजयी झाले. तर त्यापूर्वीच्या निवडणुकीत १९ नगरसेवक विजयी झाले होते. मनोहर पर्रीकर हे केंद्रात गेल्याने पणजीचा आमदार बनण्याची सुवर्णसंधी माझ्यासाठी चालून आली आहे, असे सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यानी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.कॉंग्रेस पक्षाबरोबर यापुढे राहण्याची इच्छा नसल्यानेच आपण कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरापासून दूर राहिल्याचे ते म्हणाले. पणजी मतदारसंघाचा आपणच चांगला विकास करू शकतो. आपण जनतेचा नेता असून लोकांसाठी आपण हवे तेव्हा उपलब्ध असतो. पणजी मतदारसंघासाठी काही तरी करण्याची इच्छा होती. त्यामुळेच पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आपण निर्णय घेतला असल्याचे मोन्सेर्रात यांनी सांगितले. कॉंग्रेसबरोबर आपले पटत नसल्यानेच आता आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले. पणजी महापालिका व पणजीचे आमदार यांनी हातात हात घालून काम केल्यास पणजीचा चांगला विकास होऊ शकतो. तुम्ही कोणत्याही पक्षाच्या उमेदवारीवर निवडून या, पण एकदा निवडून आले की तुम्ही जनतेचे नेते असता. म्हणून जनतेसाठी काम करणे हेच महत्त्वाचे असल्याचे मोन्सेर्रात म्हणाले. तुमच्यानंतर सांताक्रुझ मतदारसंघाचा आमदार कोण असेल याचा निर्णय तुम्ही घेतला आहे काय, असे विचारले असता, त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.