दहशतवाद्यांनी दिलेल्या बहिष्काराच्या हाकेला व दहशतीला न जुमानता जम्मू काश्मीरच्या विविध मतदारसंघांत काल बर्यापैकी मतदान झाले. अठरा मतदारसंघांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान काल झाल्याचे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले. काही ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये चकमकी झडल्या. श्रीनगरमध्येही काल शांततेत मतदान झाले. काल श्रीनगर तसेच दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, जम्मूतील शोपियॉं व सांबा क्षेत्रात मतदान झाले. सांबा जिल्ह्यातील विजयपूर मतदारसंघात सर्वाधिक ६३.४४ टक्के मतदान पहिल्या सहा तासांतच झाले होते. श्रीनगरमधील हब्बाकडल या फुटिरांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या भागात अत्यल्प म्हणजे १३.४४ टक्के मतदान झाले.