महात्मा गांधींएवढाच नथुराम गोडसे हाही देशभक्त होता असे उद्गार भाजपचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी काढल्याने वादाचे मोहोळ उठले आहे. कॉंग्रेसने यासंबंधी जोरदार टीका केली असून गोडसेचा जन्मदिवस महाराष्ट्रात शौर्य दिवस म्हणून पाळला जाणार असल्याचा आरोप केला आहे. काल राज्यसभेत या विषयावर तीव्र पडसाद उमटले. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण चालल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शून्य तासाला कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी आपण यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचे सांगितले.