भारताचे कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानची मलाला-युसुफझाई यांना काल येथे आयोजित एका समारंभात शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.सत्यार्थी व मलाला यांचा शांतीदूत अशा शब्दात नोबेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष थॉबजॉन जॅगलँड यांनी गौरव केला. ‘एक किशोरवयीन मुलगी व दुसरे काहीसे प्रौढ आणि एक भारतीय व दुसरी पाकिस्तानी, एक मुस्लिम तर दुसरे हिंदू अशा रितीने या पुरस्काराचे हे मानकरी म्हणजे जगासाठी शांततेची प्रतिकेच. ज्याची जगालाही गरज आहे. परस्पर देशांमधील सौहार्दासाठी’ असे उद्गारही त्यांनी यावेळी काढले.
६० वर्षीय सत्यार्थी यांनी बालक हक्क विषयक कार्यासाठी विद्युत अभियंत्याच्या नोकरीचाही त्याग केला व बिगर सरकारी संस्था सुरू केली. तर पाकिस्तानमधील मुलींच्या शिक्षणासाठी मलाला हिला स्वतःचा जीवही गमवावा लागला असता.
सत्यार्थी व मलाला यांना १७५ ग्रॅम सोन्याचा मुलामा असलेले पदक, पदविका तसेच प्रत्येकी दहा लाख अमेरिकी डॉलर्स अशा स्वरूपात प्रतिष्ठेचा पुरस्कार अनेक नामवंतांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी भारताचे दिग्गज सरोद वादक अमजद अली खान व पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचा कार्यक्रम झाला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी हेही यावेळी उपस्थित होते.