किनारी भागात नागरिकांना उशिरापर्यंत उपद्रव
किनारपट्टी भागांत रात्री उशिरापर्यंत संगीत रजनींचे आयोजन करून कर्णकर्कश संगीताद्वारे स्थानिक लोकांची झोपमोड करणार्यांविरुद्ध खास मोहीम उघडण्यात येणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी काल स्पष्ट केले. काही शॅकमालकही पर्यटन मौसमात रात्रभर कर्णकर्कश संगीत वाजवत असल्याच्या वाढत्या तक्रारी स्थानिकांकडून येऊ लागलेल्या आहेत. हे यापुढे सहन केले जाणार नाही असे गर्ग यांनी सांगितले.काल महिला हक्क दिनानिमित्त पणजीत महिलांच्या समस्या ऐकून घेताना गर्ग यांनी वरील स्पष्टीकरण केले.
प्रथम आम्ही वरील कारवाईसाठी दक्षता खात्याची मदत घेणार असून त्याना या मोहिमेत जर यश आले नाही तर कारवाईसाठी आम्ही विशेष पथक स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले.
रात्रभर कर्णकर्कश संगीतामुळे खूप त्रास होत असल्याच्या ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ लागलेल्या असून या परिस्थितीत आम्ही हातावर हात ठेवून गप्प बसून राहू शकत नसल्याचे गर्ग यांनी स्पष्ट केले. कर्णकर्कश संगीतामुळे ध्वनिप्रदूषण तर होतेच. लोकांना अन्य विविध समस्यांचाही सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्रास होत असतो असे गर्ग यांनी स्पष्ट केले.