सुरक्षा रक्षकांचे आजपासून आमरण उपोषण

0
85
गोवा ड्रेड युनियन कॉन्फेडेशन सलग्न गोवा नोकरभरती व रोजगार कामगार संघ जाहीर सभेत बोलताना आमदार विष्णू सुर्या वाघ. बाजूस आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार पांडुरंग मडकईकर व अन्य. समोर उपस्थित सुरक्षा रक्षक.(छाया : किशोर स. नाईक)

सरकार असंवेदनशील : कॉंग्रेस नेत्यांच्या सुरात विष्णू वाघांचाही सूर
गोवा भरती व रोजगार सोसायटीचे सुरक्षा रक्षक आपल्या विविध मागण्यांसाठी आज बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांचे नेते अजितसिंह राणे यांनी काल सांगितले.
या उपोषणानंतरही जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नंतर राज्यातील चाळीसही मतदारसंघात त्यांच्या मागण्यासंबंधी जागृती घडवून आणण्यासाठी जाहीर सभा घेण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. मागण्या मान्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, संपावर असलेल्या गोवा भरती व रोजगार सोसायटीच्या काल येथे झालेल्या जाहीर सभेतून कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष लुईझिन फालेरो, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, पांडुरंग मडकईकर, विष्णू वाघ, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस आदींसह सर्व वक्त्यांनी संपावरील सर्व सुरक्षा रक्षकांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे व त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात अशी जोरदार मागणी केली. तसेच मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलकानी आपले आंदोलन मागे घेऊ नये असे आवाहन त्यांना केले.
संपावरील सुरक्षा रक्षकांच्या मागण्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा दावा करून यावेळी सर्व वक्त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप यावेळी लुईझिन फालेरो, विष्णू वाघ, आलेक्स रेजिनाल्ड, पांडुरंग मडकईकर आदी नेत्यांनी केला.
यावेळी बोलताना लुईझिन फालेरो म्हणाले की, कॉंग्रेस सरकार सत्तेवर असताना जर तुम्ही हीच मागणी केली होती व कॉंग्रेसने ती पूर्ण केली नव्हती तर त्यासाठी आता मी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तुमची माफी मागतो. या घडीला संपूर्ण कॉंग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना विष्णू वाघ म्हणाले की, एक संवेदनशील लेखन व माणूस म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल सर्वांना सामावून घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने आशावाद निर्माण झाला असल्याचे स्पष्ट केले. अशा लोकांना पाठिंबा देणे हे पक्षाच्या विरोधात काम करणे ठरत नसल्याचे वाघ यानी यावेळी स्पष्ट केले.
ऍड. जतीन नाईक, तारा केरकर, गोविंद गावडे, सिद्धेश भगत, सुदीप ताम्हणकर, अजितसिंह राणे, ट्रॉजन डिमेलो आदी नेत्यांचीही यावेळी भाषणे झाली.