राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निरीक्षकांनी एकाच मतदारसंघात अनेकांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितल्याने साळगाव, पर्वरी, म्हापसा, शिवोली, थिवी या मतदारसंघात अनेकजण उमेदवारीचे बाशिंग बांधून तयार झाले असून त्यामुळे येत्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारीच्या प्रश्नावर पक्षात संघर्ष होण्याची शक्यता आहे. हा पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे.
साळगाव मतदारसंघात देवानंद नाईक, सुरेश परुळेकर, जयेश ही नावे पुढे आली आहेत. पर्वरी मतदारसंघात फेरमिना खंवटे, व्यंकटे प्रभू मोनी, म्हापसा मतदारसंघात प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट, आरमिन ब्रागांझा, सुभाष नार्वेकर, रायन ब्रागांझा, शिवोली मतदारसंघात राजन घाटे, उदय पालयेकर, लिन्हो डायस, अभिजित धारगळकर व फ्रान्सिस फर्नांडिस, तसेच थिवी मतदारसंघात पर्यटन मंत्री नीळकंठ हळर्णकर असतानाच निरीक्षक किरण कांदोळकर या इच्छुक उमेदवाराकडेही संपर्क ठेवून असल्याचे कळते. वरील प्रकारामुळे पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाराज बनले आहेत. प्रत्येकाला उमेदवारी देण्याचे आमिष दाखविण्यामागचे कारण काय, यावर पक्षात तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.