मोहिमेतील पोलिसांचा सत्कार; फरार चोरट्यांचा शोध जारी
महाराष्ट्रातून एक मोटारगाडी चोरून ती घेऊन गोव्यात चोर्या करण्यासाठी आलेल्या टोळीचा फिल्मी स्टाईलीत पाठलाग करून ती गाडी ताब्यात घेण्यास पोलिसांना रविवारी रात्री यश आले. मात्र, पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर गाडी टाकून देऊन चोरट्यांनी पोबारा केल्यामुळे ते सापडू शकले नाही. दरम्यान, या मोहिमेत सहभागी झालेल्या गोवा पोलिसांच्या विविध विभागातील पोलीसकर्मींना या यशाबद्दल २० हजार रु. चे बक्षीस देऊन गौरव करण्यात आल्याचे काल पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.महाराष्ट्रातून चोरून आणलेल्या या मोटारगाडीची क्रमांकपट्टी बदलून गोव्याची बनावट क्रमांकपट्टी बसवण्यात आली होती असे गाडी ताब्यात घेण्यात आल्यानंतर दिसून आल्याचे व गाडीत घरफोडी करण्यासाठी वापरली जाणारी अवजारे आढळून आल्याचे गर्ग यांनी सांगितले. जीए ०३ पी ३१६३ अशी बनावट क्रमांकपट्टी या गाडीवर बसवण्यात आली होती. आमोणे पेट्रोलपंपवर या वाहनात १९०० रु. चे पेट्रोल भरल्यानंतर पैसे न फेडताच हे वाहन वेगाने हाकून चोरटे निघून गेले होते.
पीसीआर रोबोट २७ ला हे कळताच त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. ही गाडी म्हापशाच्या दिशेने धावत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी पीसीआर रोबोट २८ ला गाडी अडवण्याची सूचना केली. याच दरम्यान अस्नोडा येथे वाहनांची कोंडी झाली. त्यामुळे चोरट्यांना वाहनाचा वेग कमी करावा लागला. यावेळी पीसीआर रोबोट २७ ने सदर गाडीला ओव्हरटेक केले. याचवेळी पीसीआर रोबोट २८ व डिचोली पोलिसांच्या जीप गाड्याही मागे आल्या. यावेळी गाडीत असलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण गाडीची दारे लॉक केलेली असल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. गाडीच्या आरशांना काळ्या फिती लावलेल्या असल्याने आत कोण आहेत तेही पोलिसांना कळू शकले नाही. याचवेळी चोरट्यांनी गाडी फूटपाथवर चढवली. यावेळी गाडीचा एक टायर फुटला. मात्र, त्याही परिस्थितीत ते गाडी घेऊन पुढे निघाले.
पोलिसांनीही यावेळी पाठलाग केला. मात्र, पेडे-म्हापसा येथे त्यांना वाहन टाकून देण्यात आलेल्या अवस्थेत सापडले. मात्र, चोरटे हाती लागू शकले नाहीत. चोरट्यांनी ही गाडी सांगली येथून चोरून आणल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. हे चोरटे चोरी करण्यासाठीच गोव्यात आले होते. त्यांचा शोध घेण्याचे काम जारी आहे. ते सापडल्यास गोव्यात झालेल्या चोर्यांचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
या कामगिरीबद्दल बक्षीस देण्यात आलेल्यांमध्ये संदीप वस्त, तुळशीदास मळीक, हे कॉन्स्टेबल, प्रशांत पळ, सुभाष माशेलकर, उमेश नाईक हे पीसी ड्रायव्हर, हेड कॉन्स्टेबल सुनील कामत, कॉन्स्टेबल इंद्रकांत घाडी, परेश गावकर, निरीक्षक रुपेंद्र शेटगावकर, उपनिरीक्षक यशवंत गावस, हेड कॉन्स्टेबल ए. डी. गावस, होमगार्ड ड्रायव्हर रत्नाकर गाड व पीसी ड्रायव्हर प्रकाश गाड यांचा समावेश आहे.