– संदीप मणेरीकर
कोकण म्हटलं की, डोळ्यांसमोर उभं रहातं ते कौलारी घर, निसर्गानं डवरलेला परिसर, आंब्या-फणसाची झाडं, माड-पोफळीच्या झाडांनी बहरलेला परिसर आणि दारात भलं मोठं शेणानं सारवलेलं अंगण, त्या अंगणावर मंडप, माड-पोफळींच्या झावळ्यांचा. घराच्या मागे किंवा पुढे झुळूझुळू वाहणारा पाण्याचा पाट. आमच्या घरी असाच साधारण थाट आहे. शेजारी घरं आहेत एका बाजूने तर दुसर्या एका बाजून परसू. त्यात पूर्वी मोठमोठी झाडं होती. त्यामुळे थंडगार वारा यायचा. वेगळ्या फॅनची म्हणून कधी गरज भासली नाही. मात्र सध्या मालकानं ती झाडं तोडलेली आहेत. पण तरीही तिथे तशी लहान मोठी झुडपं आहेत. मंडप असताना मंडपावर त्या झाडांची पानं पडतात, अन्यथा अंगणात ती येतात. मात्र वारा झुळझुळत असतो. आमच्या घरी कसलाही कार्यक्रम असला की आई कोणालातरी कामासाठी बोलावून त्यांच्याकडून आमचं स्वयंपाकघर, माजघर, बाहेरची खोली, मागीलदारची खोली, मंडप घातलेला असेल तर अंगण हे सर्व शेणानं सारवून घ्यायची. शेणानं सारवलेली ही जमीन किती सुंदर दिसते. ज्यांच्याकडे अशी जमीन होती किंवा आहे त्यांनाच त्याचं सौंदर्य कळेल. आमच्या घरी पूर्वी सगळीकडेच अशा जमिनी होत्या. सध्या मात्र पाठीमागे सिमेंट घातलेलं आहे. मात्र इतर सर्वत्र अशा जमिनी आहेत. सणासुदीलाच या जमिनींना शेण काढलं जातं असं नव्हे तर मध्येही केव्हातरी असं शेण काढलं जातंच. स्वयंपाकघरात तर आम्ही जेवायला बसतो त्या जागी तर जेवून झाल्यानंतर घरातील महिलावर्ग नेहमी शेण लावतात. एकतर उष्ट-खरकटं पडलेलं असतं. शेणाचा गोळा फिरवला की सगळी शीतं किंवा इतर काहीही खाली सांडलेलं असलं तर ते त्या शेणाच्या गोळ्याला चिकटून जातं. मग हा शेणाचा गोळा फेकून द्यायचा.
बाहेर ओसरीवर किंवा इतर कुठे जेव्हा खूप दिवसांनी असं शेण काढलं जातं त्यावेळी ते शेण वाळल्यानंतर त्या ठिकाणी रांगोळी काढण्याची प्रथा आहे. शेणानं काळ्याकुट्ट झालेल्या अशा जमिनीवर अशी रांगोळी किती सुबक आणि सुंदर दिसते याचा खर्या कलाकारानेच आणि जाणकारानेच अनुभव घ्यावा. मुळात पार्श्वभूमी काळ्या कुट्ट रंगाची आपोआपच सापडलेली असते. त्यामुळे अशा सुंदर पार्श्वभूमीवर रांगोळी सुदंरच दिसणार. त्यासाठी मोठ्या आणि कलाकृतीपूर्ण रांगोळीचीही गरज नसते. साधं एक स्वस्तिक जरी काढलं तरीही ते उठून दिसतं.
अंगणात असलेल्या तुलसी वृंदावनासमोर चैत्र महिन्यात चैत्रांगण घालण्याची नवविवाहितांमध्ये काही ठिकाणी पद्धत आहे. विवाहाची पहिली पाच वर्षे आषाढी ते कार्तिकी एकादशीपर्यंत गोपद्म काढण्याची एक पद्धत आहे. अशावेळी तुलसी वृंदावनासमोर शेणाने आपल्याला पाहिजे तेवढी जागा सारवून त्या ठिकाणी अशी गोपद्म किंवा चैत्रांगण रेखाटली जातात. महाशिवरात्रीच्या दिवसांत तुलसी वृंदावनासमोर शेण सारवून, चूल सारवून खीर शिजवण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. हे सारं अंगण असलं तरच शक्य आहे. अंगण असतं, तेही शेणानं सारवलेलं तर ही सारी रांगोळी किती सुबक दिसत असते.
त्याचप्रमाणे अशा या शेणाच्या जमिनीत पूर्वीच्या काळी काचा भरणे हा प्रकार होता. या काचा भरणे म्हणजे टाकाऊतून टिकाऊसाठी एक उत्तम उदाहरण आहे. घरात असलेल्या चीनी मातीच्या बशा, कप ह्या वस्तू कधी कधी फुटणार्याच असतात. मग यातील पांढर्या शुभ्र रंगाच्या फुटलेल्या काचांचे तुकडे गोळा करायचे. मोठे असल्यास त्याचे साधारण एकेका इंचाचे तुकडे करायचे. मग त्यांचा आकार कसाही असला तरी चालतो. पण तसे तुकडे करायचे. त्या अगोदर ज्या ठिकाणी ह्या काचा भरायच्या आहेत, त्या ठिकाणची जमीन थोडी तरी ओली असावी लागते. नुकतीच केलेली जमीन त्यासाठी अत्युत्तम असते. अशा या जमिनीवर पाहिजे असल्यास हाताने पाहिजे ती नक्षी हाताने किंवा खडूने रेखाटायची. मग त्या रेषांवर काचांचे तुकडे सरळ रेषेत ठेवायचे व त्यावर हातोड्याने हलक्या हाताने ठोकायचे. अगदी जमिनीबरोबर हे तुकडे आत गेले पाहिजेत. जमिनीशी एकरूप व्हावे लागतात. मग त्यावर शेण जरी काढलं तरी ते रहात नाही. मात्र आजूबाजूला शेण सारवलेलं असल्यामुळे अशी ही नक्षी किती सुंदरपणे उठून दिसते, हे प्रत्यक्ष पहावंच लागेल. खरं तर सुंदरतेला कसंलही प्रमाण लागत नाही. सुंदरता ही सुंदरच असते. त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही.
एखादं स्वस्तिक, कमळाचं फुल, ओम अशा विविध कलाकृतीत या काचा भरल्या की त्या कलाकृतींनाही एक वेगळंच सौंदर्य प्राप्त होतं. खेड्यात तर अशा कलाकृती जागोजागी आढळतात. फक्त आपण खेडी मागासलेली असतात, अडाणी असतात, सुशिक्षित नसतात असा भ्रम करून घेतल्यामुळे शहरी तेवढं चांगलं आणि ग्रामीण मात्र काहीही चांगलं असलं तरी ते मागास असल्याचा आपल्याला पदोपदी साक्षात्कार होत असतो. पण जातीवंत कलाकाराला हे कलेतलं सौंदर्य सतत दिसतं असतं. कारण निसर्ग जिथं असतो तिथं खरं सौंदर्य सदोदित वास करत असतं.
शेणानं सारवलेल्या जमिनीवर जेवायलाही मजा येते. अस्सल भारतीय पद्धतीचं जेवण जेवायचं असेल तर अशा शेण सारवलेल्या जमिनीवर जेवायला मांडी ठोकून बसावं. जेवणासाठी केळीचं पान, बसायला पाट, पाटाच्या डाव्या बाजूला पाण्याचा तांब्या व त्यावर पेला झाकून ठेवलेला. पानाला सुंदर वेलबुट्टीची रांगोळी, बाजूला अगरबत्तीचा सुवास दरवळतोय असा थाट आणि पानावर भात, वरण, आमटी, ग्रामीण भागात होणार्या भाजीपाल्याची भाजी, झणझणीत लोणचं असा थाट असल्यानंतर खरं तर हे वाचल्यानंतरही तुमच्या तोंडालाही पाणी सुटेल. मग समोरच जर असा थाट असेल तर जेवणाला काय बहार येईल? हे लिहित असताना आत्ताही माझ्या पोटात कावळे ओरडू लागले आहेत.
या शेणानं सारवलेल्या जमिनीवर कधीही आडवं पडावं. थंडगार जमीन असल्यामुळे अशा जमिनीवर सुखद झोप लागते. मनात कितीही द्वंद्व चालू असलं, ताण असला तरी अशा या जमिनीवर आडवं व्हावं, क्षणात सारा ताण-तणाव दूर होऊन एक सुखद अनुभव मिळतो. याचं कारण काय असावं याचा विचार करताना मला तरी असं जाणवलं की, या जमिनीवर महिलावर्गाचा जो शेणाचा हात फिरत असतो, तो अत्यंत मायेचा असतो. आईच्या ममतेनं तो हात फिरत असतो. शेणानं हात लडबडलेले असले तरी या महिला कधी कंटाळत नाही. सकाळी शेण सारवल्यानंतर हाताला दिवसभर तो शेणाचा वास तसाच येत रहातो, पण तरीही त्याचा या महिलांना कधी कंटाळा येत नाही. त्या वासाला त्या कधी विटत नाहीत. अत्यंत हळुवारपणे हात फिरवत शेण सारवलं जातं. त्यामुळे त्यात हातामागे आईचं ममत्व असतं, ते त्या जमिनीतही उतरत असावं. त्यामुळे त्याच ममत्वानं आपल्या पाठीवर झोपलेल्या कोणत्याही व्यक्तीवर जमीन मायाच करत असते. म्हणूनच बहुधा शांत झोप लागत असावी असा माझा कयास आहे. या मातीवर कोवळं मुल पडलं तरी त्याला कधी लागत नाही, याचं कारणही हाच वात्सल्याचा गुण असावा. ज्या जमिनींवर आपण रहातो, त्या जमिनीवर माया करण्याचं कसब या महिलांना साधलेलं असतं. त्यामुळे जिथे असा मायेचा ओलावा असतो, तिथे हे वात्सल्य आढळून येणारच. फरशा असलेल्या फ्लॅटच्या खोलीत प्रवेश केला व शेणानं सारवलेल्या घरच्या अंगणात जरी प्रवेश केला तरी दोन्हींमधला फरक आपल्याला जाणवत राहीलच.
आज अशी शेणाची जमीन कुठे राहिलेली नाही. शेण सारवण्यासाठी माणसं मिळत नसल्यामुळे या जमिनींची जागा फरशांनी घेतलेली आहे. आज आम्ही बहुतेक जण फ्लॅट किंवा बंगल्यामध्ये रहातो. अशा या फ्लॅटमध्ये आम्हांला अशा शेणानं सारवलेल्या आईच्या ममतेच्या जमिनी मिळत नाहीत. या टाईल्सवर आज कामासाठी येणार्या मोलकरणींचा हात फिरत असतो. पण तो हात फिरत नाही तर केवळ पाण्यानं भिजलेला कापडाचा बोळा फिरत असतो. कारण त्या हातात केवळ काम उरकणं असतं. त्यामुळे त्या कामाबद्दल ना जिव्हाळा, ना आस्था ना माया. त्यामुळे या टाईल्सवर झोपलं तर दहा मिनिटांत आपल्या पाठीत भरून येतं. या टाईल्सवर रांगोळी घालताना टाईल्सचा रंग पाहूनच त्याप्रमाणे घालावी लागते. पण तिथे पार्श्वभूमीला शेणाची जमीन नसते. त्यामुळे पांढरी रांगोळीही उठून दिसत नाही. फ्लॅट संस्कृतीमुळे सारंच फ्लॅट झालेलं आहे. तुलसी वृंदावन कुंडीत आलेलं आहे. त्यामुळे तिथे रांगोळी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळात फ्लॅटमध्ये तशी जागा कुठे असते? आणि बंगल्यात जरी आपण रहात असलो तरी बंगल्याभोवती असलेली जागा काही आपण शेणानं सारवत नाही. कारण शो जातो. त्यामुळे तिथेही मोठ्याला फरशा घातल्या जातात. त्यामुळे अशा फरशांवर रांगोळी घातली जाते.
आज आपण विकासाच्या नावाने दिखावूपणाच्या मागे लागलेलो आहोत. या दिखावूपणामुळे अस्सलपणा मात्र गायब होत आहे. दिखावूपणात भक्कमपणा नसतो. रानमेव्यापेक्षाही आपल्याला चायनीज फूड आवडू लागलेलं आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. आणि यातूनच आपला ओढा शहराकडे वाढलेला आहे. त्यामुळे शेणानं सारवलेली जमीन आपल्यातून ओघळत जात असून आपल्या जीवनातून हा आणखी एक मोती निसटून जात आहे.