संतभूमी पैठण

0
1083

– सौ. पौर्णिमा केरकर संतांनी अद्वैत आणि भक्तीचा सुंदर समन्वय घडवून आणला. अद्वैतानुभवाच्या पायावरच भगवद्भक्तीचे साम्राज्य उभारले. सदाचार, सत्य, अहिंसा, शुचित्व, पावित्र्य इ. सद्गुणांच्या सामर्थ्याने सर्व जाती, धर्म, वर्णांतील स्त्री-पुरुषांना भक्तिसंप्रदायात सामावून घेतले. शेकडो वर्षांपूर्वी ज्या भूमीने जातीभेद-वर्णभेदाची बंधने गौण मानून सर्वधर्मसमभावाची शिकवण सामान्यांपासून असामान्यांना दिली, पुरुषांबरोबरीने स्त्रियांनासुद्धा भक्तीचा समानतेचा अधिकार बहाल केला, प्रपंचाच्या जोडीनेच परमार्थाला महत्त्व दिले, अशा भूमीचे म्हणजेच ‘पैठण’चे स्वतःचे असे खास वेगळेपण आहे.पैठणला जाऊन काय पाहायचे? असा विचार खूप जणांच्या मनात येणे साहजिकच आहे. कारण अतिश्रीमंत, झगझगीत, चकचकीत स्थळांपैकी हे एक पर्यटनाचे स्थळ आहे असे नाहीच मुळी. त्यामुळे मुद्दामहून प्रवास करून पैठण पाहाचेच असा विचार निव्वळ पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी म्हणून ज्यांचा प्रवास असतो त्यांच्या मनात येणे जरा अशक्यच. त्याला कारणेही तशीच आहेत. एकेकाळी सातवाहनाची राजधानी म्हणून दिमाख मिरविणारे हे प्रतिष्ठान कालांतराने चालुक्य, राष्ट्रकुट इत्यादींच्या आधिपत्याखाली आले. या राजवटींनी आपल्या राजधान्या दुसरीकडे हलविल्या. त्यावेळेपासून या ठिकाणाच्या राजवैभवाला उतरती कळा लागली. पूर्वीचा एक राजधानी म्हणून असलेला रुबाब ओसरला व पैठण एक फक्त तालुक्याचे ठिकाण एवढाच लौकिक राहिला. असे असले तरी पैठण हे एक धर्मक्षेत्र व संतक्षेत्र म्हणून भक्तमंडळीना व सर्वसामान्य लोकमानसाला आजही तेवढेच वंदनीय वाटते ते तेथील मातीच्या कणाकणांना पदस्पर्श केलेल्या संतमंडळीमुळेच! त्यातही समाजातील अंध रूढी, रीतीरिवाज, दांभिक वृत्तीचा खरपूस समाचार आपल्या भारुडातून घेणारे संत एकनाथ महाराज यांची समानतेची पंगत याच भूमीशी समरस झालेली होती, म्हणूनच पैठणला एक आगळीवेगळी आध्यात्मिक उंची प्राप्त झालेली आहे. संत एकनाथ महाराजांचे नाव इतर संतमंडळीच्या मांदियाळीतील एक महत्त्वपूर्ण नाव. ज्या कालखंडात कर्मकांडांना ऊत आलेला होता त्याच काळात या ज्ञानसूर्याने समाजमनाला जागे करण्यासाठी जागल्याची भूमिका बजावली. शेकडो वर्षांपूर्वीची त्यांची ही दूरदृष्टी त्यांच्या विचारधारेची साक्ष पटविते. म्हणूनच म्हटलेय की निव्वळ चकचकीत स्थळांपुरतेच पर्यटन करायचे, वास्तू मग त्या ऐतिहासिक असो अथवा राजकीय-सांस्कृतिकदृष्ट्या वैभवपूर्ण असो, त्या निरखायच्या, खरेदी करायची व परत फिरायचे अशा विचाराने प्रवास केला तर त्यांना पैठणशी एकरूप होणे जरा कठीणच जाईल. सातवाहनाच्या राजवटीनंतर या प्रदेशाला लाभलेले दुर्मुखलेपण आजही पुसले गेले नाही. अज्ञान, दारिद्य्र, आरोग्यविषयक हेळसांड, स्वच्छतेचा अभाव यातून आलेला एक बकालपणा जागोजागी दिसतो. पुरोगामी विचारांची बैठक ज्या भूमीला कित्येक वर्षांपासून लाभलेली होती, त्या भूमीची अशी दुरावस्था पाहून मनात खंत निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे पैठण ही संतभूमी आहे. सोळाव्या शतकातील संत एकनाथ महाराजांची ही जन्मभूमी, कर्मभूमी व निर्वाणभूमी म्हणूनही या स्थानाचे वेगळेपण सर्वसामान्यांच्या हृदयात अढळ आहे. नाथषष्ठीचा उत्सव येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो. या उत्सवासाठीच पैठणची वारी करणारे भाविक लक्षणीय संख्येने दिसून येतात. एरव्ही पर्यटनाच्या दिवसांतसुद्धा कित्येकांचे पाय नाथमंदिराकडे वळतात, परंतु त्यापूर्वी ही मंडळी अजंठा, वेरुळची लेणी पाहून आलेली असते. पैठणहून औरंगाबाद पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावर असल्याने या दोन्ही जागांना प्राधान्य देता येते. गोदावरी काठी वसलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे एक तीर्थक्षेत्र आहे. नाथांसाठी जशी ही जागा प्रसिद्ध आहे तशीच जैन तीर्थकर, जायकवाडी धरण- जिथे स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत- अशी ही जागा आहे. त्याशिवाय वृंदावन गार्डनच्या धर्तीवरील संत ज्ञानेश्‍वर उद्यान, असंख्य उच्च विद्याविभूषित, प्रकांड पंडितांची जन्मस्थळे इथे पाहता येतात. एकेकाळी व्यापाराच्या माध्यमातून होणार्‍या देवाण-घेवाणीसाठी या शहराची खास ओळख होती याची प्रचीती येथील घराघरांतील आजही अस्तित्वात असलेल्या हातमागावर विणण्यात येणार्‍या ‘पैठणी’ साडीच्या माध्यमातून येते. ‘पैठण’ या नावावरूनच ‘पैठणी’ सर्वदूर पोचली. पैठणी साडीचा पदर, तिची किनार, काठपदर यावरची कलाकुसर यातून इथल्या कारागिरांचे कौशल्य नजरेस पडते. पैठणला ‘दक्षिण काशी’ असेही संबोधले जायचे. संस्कृत भाषेचे महापीठ येथेच अस्तित्वात होते. नवनवोन्मेशशालिनी विद्या, कला यांना सातवाहनाच्या राज्यकाळात प्राधान्य होते. बृहत्कथेचा कर्ता गुणाठ्याची हीच जन्मभूमी. प्राकृत भाषेला महत्त्वाचा मान ही गुणाठ्याची देणगी. असंख्य ज्ञानाच्या शाखा येथे जन्मल्या. व्याकरण, धर्मशास्त्रावरच्या ग्रंथांची निर्मिती याच संतभूमीने केली. गागाभट्ट ज्यांनी शिवाजी महाराजांना पारखले, निरखले, त्यांचे क्षत्रियत्व सिद्ध करून त्यांचा राज्याभिषेक केला ते याच पैठणचे! अनेक धर्मपंडित इथे जन्मले. त्यातील काहींनी पुरोगामी विचारांची कास धरून समानतेचे स्वत्व निर्माण केले, तर काहींनी कर्मकांडांच्या जोरावर स्वतःचा दबदबा निर्माण करीत समस्त अज्ञजनांना, सर्वसामान्यांना वेठीस धरले. ज्ञानेश्‍वरादी भावंडेसुद्धा त्यांच्या कर्मठ विचारसरणीतून सुटली नाहीत. त्यांच्या दाहकतेचे चटके त्या कोवळ्या जिवांना सहन करूनच स्वतःचे पावित्र्य सिद्ध करावे लागले, ती भूमी म्हणजे पैठणच होती. संन्याशाची पोरे म्हणून हिणवल्या गेल्यानंतर या भावंडांना पैठणच्या धर्मशास्त्र्यांकडून शुद्धिपत्रक आणण्यासाठी पाठवण्यात आले. संत ज्ञानेश्‍वरांनीसुद्धा रेड्यामुखी वेद वदवून अद्वैतानुभूतीचा साक्षात्कार समस्तांना घडविला. ही घटना गोदाकाठच्या नागतीर्थावर घडली. तो घाट इथे ‘नागघाट’ म्हणून प्रसिद्ध आहे. महानुभाव संप्रदायाचे जनक चक्रधरस्वामींचे वास्तव्य येथील भोगनारायण मंदिरात होते. ते मंदिर आज दयनीय अवस्थेत दिसते. या मंदिरातील काही महिन्यांच्या वास्तव्यानंतर त्यांनी संन्यास घेतला. आज पैठणला गेल्यानंतर पहिल्याप्रथम आपली पावले वळतात ती नाथमंदिराकडे. एकनाथ महाराजांच्या राहत्या वाड्याचे रूपांतरच आता मंदिरात केलेले आहे. वाड्याचे देवघर हाच मंदिराचा गाभारा आहे. गाभार्‍यापुढील खांब, महाद्वार, वाड्याच्या भिंती या वास्तूचा जुना थाट दर्शवितात. श्रीखंड्याच्या रूपात सावळ्या हरीने गोदावरीच्या पाण्यात कावडी भरून पाणी हौदात ओतले तो हौदसुद्धा अस्तित्वात आहे. नाथांचे समाधीमंदिर वाळवंटाला लागूनच बांधलेले आहे. गोदावरीच्या तीरावरच हा वाडा असल्याने निसर्गसौंदर्याचे एक वेगळेपण या स्थळाला आहे. पण त्याच्या जोडीनेच आजचे गोदावरीचे रूप पाहता त्याला आलेली बकाल अवस्था, दुर्गंधी पाहून मन अस्वस्थ होते. काठाजवळ बसून गोदावरीच्या पाण्याने ओंजळ भरावी व ती मनोभावे प्राशन करावी, डोळ्यांना त्या पाण्याने शीतलता प्रदान करावी अशी जरी इच्छा मनात दाटून आली तरी तसे करता येणार नाही एवढी गलिच्छता या परिसरात व्यापून राहिलेली आहे. ज्या पवित्र जागेत नाथांनी आपला देह विसर्जित केला त्या परिसरातील हे गलिच्छ साम्राज्य अनुभवता ज्या भूमीने ज्ञानसूर्य बहाल केले, प्रकांड पंडितांची, धर्मशास्त्र्यांची मांदियाळी निर्माण केली, तेथील लोकमानस स्वच्छतेच्या बाबतीत अज्ञानीच कसे राहिले हा प्रश्‍न संपूर्ण प्रवासात सतावत राहिला. नाथमंदिराच्या जवळपास असलेल्या ज्ञानेश्‍वर उद्यानाकडे जाऊन ज्ञानेश्‍वरादी भावंडांच्या आठवणींना उजाळा देता येतो. पैठणला गेल्यानंतर मुलाबाळांच्या आकर्षणाचे केंद्र कुठले असेल तर हे संत ज्ञानेश्‍वर उद्यान. चौघेही भावंडे भिंतीवर बसून चांगदेवाच्या भेटीला जातात हा पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. येथून जवळच जायकावाडी धरण परिसर पाहता येतो. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हा परिसर महत्त्वाचा मानला गेला आहे. सत्तावीस दरवाजे असलेले हे धरण पर्यटकांच्या ज्ञानात भर घालणारे आहेच, शिवाय प्रदेशाचे वेगळेपणसुद्धा अधोरेखित करते. पैठणचा प्रवास हा वेगवेगळा दृष्टिकोन बाळगूनसुद्धा करता येतो. तीर्थाटनाला भेट देऊन पुण्यप्राप्ती घडवायची असेल तर नाथमंदिर, जैन तीर्थकरांची मूर्ती, नागघाट, ज्ञानाईविषयीची माहिती घेता येते. पर्यावरणप्रेमींना पक्षी अभयारण्य खुणावू शकते. मुलांच्या मनोरंजनासाठी व संतमंडळीची ओळख करून देण्यासाठी ‘संत ज्ञानेश्‍वर उद्यान’ आहेच. त्याशिवाय खास महिलावर्गाला खूश करण्यासाठी खुद्द स्त्रीमनाचे खास आकर्षण असलेले पैठणी साड्यांचे माहेरघर असलेले पैठणचे हातमाग पाहता येतात. नुसते पाहणेच नाही तर एवढ्या लांब पैठणला आलो आणि पैठणी घेतली नाही तर कसे होईल? या विचाराने एखाददुसरी ‘पैठणी’ घेतलीच जाते. पैठणला जाऊन खास हातमागावरती विणलेली, प्रत्यक्षात डोळ्यांनी विणताना पाहून नंतर मी ती साडी माझ्यासाठी विकत घेतली हा आनंदच अवर्णनीय असा आहे. शिवाय औरंगाबादची लेणी पाहून आपला परतीचा प्रवास असतो तेव्हा आर्थिकदृष्ट्या काळजी तशी कमीच असते. लहान लहान बैठी घरे, परंतु प्रत्येक घरात हातमाग व त्या हातमागावरती साड्या वीणणारे वीणकर पाहणे हासुद्धा एक वेगळा अनुभव आहे. अतिशय सूक्ष्म, नाजूक अशा रेशीम धाग्यांपासून, ज्याला सोन्या-चांदीचा मुलामा चढविलेला आहे अशा धाग्यांपासून विणण्यात येणारी ही साडी महाराष्ट्रातील श्रीमंत साडी म्हणून ओळखली जाते. पेशवाईत तर तिला महत्त्वपूर्ण स्थान होते. जांभळा, गुलाबी, भगवा, पिवळा इ. रंग-रंगांची संगती, त्याशिवाय मोर, पोपट, कमळ या भारतीय संस्कृतीतील प्रतिकचिन्हांना पदरावर, काठावर प्राधान्य दिलेले दिसते. औरंगाबादमधील लेणी जवळपास आहेत म्हणून की काय या साडीवर बौद्ध संस्कृतीचा प्रभाव आढळतो. आठ हजारापासून ते लाखो रुपयांच्या किमती साड्या तिथे विणण्यात येतात. एक अतिशय नाजूक सुंदर कलात्मक वेलबुट्टी असलेली पैठणी विणण्यात येत होती. खूप आवडली म्हणून स्पर्श केला. किंमत विचारली, उत्तर मिळाले- ‘फक्त पाच लाख रुपये!’ मला वाटले नीट ऐकू आले नसावे. परत विचारले तर उत्तर तेच!! एवढ्या महागड्या साड्या कोण नसतं? उत्तर होते ही कुठली महाग साडी. दहा-पंधरा लाखांच्या साड्यासुद्धा आहेत. चित्रपटसृष्टीतील तारका, उद्योगपतींच्या बायका, करोडपती व्यावसायिक यांचे गिर्‍हाईक असतेच की! आता आणखी विचारण्यासारखे निदान पैठणीच्या बाबतीत तरी काही राहिले नव्हते. शांताबाई शेळकेंची ‘पैठणी’ कविता आठवली. दहा लाखांच्या साडीला स्पर्श करून पाहायची अनिवार इच्छा होती. पण पाच लाखांच्या पैठणीला स्पर्श करून पैठणीसारखी गर्भश्रीमंत साडी तयार करणारे वीणकर, त्यांची घरे, त्यांचा परिवार, एकूणच पैठणचा आजूबाजूचा परिसर अनुभवीत त्यातील मोठी दरी, विसंगती मनात साठवीत आम्ही पैठणचा निरोप घेतला तो संत एकनाथ महाराजांची सामाजिक समानता व ज्ञानाई माऊलीची अद्वैतता आठवूनच!